डॉ. जनार्दन पांडुरंग भोसले यांना ‘पलपब समाज भूषण पुरस्कार २०२५’ जाहीर
आटपाडी kd24newz :वाई. राज्यस्तरीय साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत अहमदाबाद (गुजरात) येथील प्रतिष्ठित पलपब साहित्य प्रकाशन संस्थेने वाई (ता. वाई) येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. जनार्दन पांडुरंग भोसले यांना ‘पलपब समाज भूषण पुरस्कार २०२५’ जाहीर केला आहे.
या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून विविध साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या तज्ञ निवड समितीने डॉ. भोसले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक कार्याचा गौरव करत हा मानाचा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला.
पुरस्कार वितरण समारंभ रविवार, ११ मे २०२५ रोजी सातारा येथील स्वराज कॉन्फरन्स हॉल अँड लॉन्स, रहिमतपूर रोड, कोडोली येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात राज्यभरातील अनेक नामवंत साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, वाचक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी डॉ. भोसले यांचा गौरव महाराष्ट्र अध्यक्ष श्री. किरण तोडकर, सूर्यवंशी सर आणि सातारा अध्यक्ष श्री. विजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
डॉ. भोसले यांची "फ. म. शहाजिंदे यांच्या कवितेतील निधर्मीवाद" ही साहित्यिक कलाकृती अत्यंत दर्जेदार आणि विचारप्रवर्तक मानली गेली असून, हाच ग्रंथ त्यांच्या पुरस्कार प्राप्तीचा मुख्य आधार ठरला आहे. त्यांच्या निवडीबाबत वाई, बावधन, सातारा आणि पुणे परिसरातील साहित्यिक, शैक्षणिक व राजकीय वर्तुळांतून विशेष कौतुक व्यक्त होत आहे.
हा पुरस्कार म्हणजे डॉ. भोसले यांच्या सातत्यपूर्ण, सखोल आणि मूल्याधिष्ठित साहित्यसेवेचा गौरव असून, नव्या पिढीसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.