आटपाडी तालुक्यातील बनपुरी-शेंडगेवाडी रस्त्यासाठी उद्यापासून आमरण उपोषण; ग्रामस्थांचा विकासासाठी लढा सुरू
आटपाडी kd24newz :आटपाडी तालुक्यातील बनपुरी हद्दीतून शेंडगेवाडीला जाणारा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता तब्बल दोन वर्षांपासून रखडला आहे. या रखडलेल्या रस्त्यामुळे ग्रामस्थांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अखेर ग्रामस्थांनी आता रस्त्यासाठी आमरण उपोषण पुकारले असून सोमवार, दि. २३ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून तहसिल कार्यालय, आटपाडी येथे हे उपोषण सुरू होणार आहे.
“हा रस्ता आमचा आहे आणि त्यावर हक्कही आमचा आहे. एक-दोन उपद्रवींमुळे गावाचा विकास थांबवू दिला जाणार नाही. गावाच्या हक्कासाठी आता मैदानात उतरायलाच हवे,” असे ठाम मत शेंडगेवाडी गावातील सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
गेल्या दोन वर्षांत हा रस्ता अपूर्ण असल्याने शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका सेवा, शेतमाल वाहतूक यावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत.
"एक लढाई सुरक्षतेची, आपल्या एकजुटीची" या घोषवाक्याखाली हे आंदोलन होणार असून शासनाने तातडीने रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
या उपोषणाला स्थानिक शेतकरी संघटना,युवक, महिला मंडळे,विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळणार असल्याचे समजते आहे.