दिघंची येथे बळीराजा शेतकरी संघटनेचे भिक मागो आंदोलन;आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचाराविरोधात संतप्त शेतकऱ्यांचा हुंकार
आटपाडी kd24newz :दिघंची, कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रचंड भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आणि डॉ. उन्मेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज रविवार, दि. २२ जून २०२५ रोजी दिघंची येथे अनोखे भिक मागो आंदोलन करण्यात आले. दिघंची बस स्टॅण्ड पासून बाजार मुख्य पेठेपर्यंत शेतकऱ्यांनी भिकारी वेष परिधान करून व्यापारी, बाजारपेठेत येणारे नागरिक व सर्वसामान्यांकडून प्रत्येकी एक रुपयांची भीक म्हणून वर्गणी गोळा केली.
यातून एकूण २०० रुपयांची रक्कम जमा होऊन ती आटपाडीचे नायब तहसीलदार दादासो पुकळे यांचे कडे देऊन ती भ्रष्ट प्रशासनाला भेट म्हणून देण्यात आली. या आंदोलनाने बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या विरोधात जनतेचा रोष उफाळून आला.
यावेळी डॉ.उन्मेश देशमुख म्हणाले, दि. ९ जून २०२५ रोजी तालुका उपनिबंधक व मार्केट कमिटीला निवेदन देऊन संचालक मंडळाचे राजीनामे घ्यावेत, शासकीय ऑडिट करावे व संचालकांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली होती. दिघंची येथील बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर मार्च ते मे २०२५ या कालावधीत तब्बल १८ लाख ४७ हजार रुपयांचा घोटाळा झाला असून, सभापती, संचालक व सचिव यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यांनीच घोटाळा झालेची कबुली पत्रकार परिषदेत दिली होती. तरीही अद्याप कारवाई झाली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला, असे ते म्हणाले.
जर संचालकांचे राजीनामे घेण्यात आले नाहीत व गुन्हे दाखल झाले नाहीत, तर तालुका उपनिबंधक कार्यालयावर आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात बळीराजा शेतकरी संघटनेचे युवक प्रदेश उपाध्यक्ष गणेशदादा शेवाळे यांनी भिकाऱ्याचा पोशाख करून स्वतः एक रुपया गोळा करत जनजागृती केली. तसेच संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, सांगली जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, आटपाडी तालुकाध्यक्ष दिलीप तात्या काटकर, खानापूर विधानसभा क्षेत्राध्यक्ष संजय ढोक, एडवोकेट विलासराव देशमुख, अशोकआबा गायकवाड, आकाराम पवार, महादेव लोखंडे, महादेव काटकर
बाळासाहेब औधकर, गंगाराम मोरे, नंदकुमार साठे, आकाराम पवार, महादेव लोखंडे, अरुण जावीर, शंकर जावीर यांच्यासह अनेक शेतकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे संतप्त मनोदय आणि आंदोलनाची तीव्रता पाहता प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.तरी बळीराजा शेतकरी संघटनेच्या या आंदोलनात्मक पवित्र्यामुळे प्रशासन कारवाई करणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.