Sanvad News शेंडगेवाडी- बनपुरी रस्ता रखडल्याने ग्रामस्थांचं तहसीलसमोर आमरण उपोषण

शेंडगेवाडी- बनपुरी रस्ता रखडल्याने ग्रामस्थांचं तहसीलसमोर आमरण उपोषण

Admin

 शेंडगेवाडी- बनपुरी रस्ता रखडल्याने ग्रामस्थांचं तहसीलसमोर आमरण उपोषण

 स्थानिक अडथळ्यांवर प्रशासनाने त्वरित तोडगा काढावा ; ग्रामस्थांचा निर्धार

आटपाडी kd24newz : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेला बनपुरी ते शेंडगेवाडी रस्ता स्थानिक अडथळ्यांमुळे रखडला असून, संतप्त शेंडगेवाडी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सोमवार (२३ जून) पासून सुरुवात केली आहे. “रस्ता पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,” असा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


    या रस्त्याचे तीन ते साडेतीन किलोमीटरचे काम मागील तीन वर्षांत झाले आहे. मात्र, अखेरचा सुमारे एक किलोमीटरचा टप्पा काही स्थानिक नागरिकांच्या वादामुळे थांबला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, हा रस्ता पूर्वापार वहिवाटीचा असून, आता अडथळे निर्माण करणे हे गावाच्या विकासाला खो घालणारे आहे. प्रशासनाने त्वरित तोडगा काढून हा रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी जोर धरत आहे.


   उपोषणस्थळी समाधान कचरे, कैलास शेंडगे आणि सचिन बंडगर हे ठामपणे उपोषण करत असून, त्यांना संपूर्ण गावकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. शेंडगेवाडी ग्रामस्थांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी दत्तात्रय पाटील (पंच), कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पैलवान संतोष, संचालक सुबराव (नाना) पाटील, माजी सभापती जयवंतभाऊ सरगर, भाजपचे सोशल मीडिया अध्यक्ष आबासाहेब भानवसे,मनसे नेते प्रकाश गायकवाड तसेच काँग्रेस नेते डी. एम. पाटील सर, विजय देवकर, सरपंच राजाराम वाक्षे, इंजिनियर महेशकुमार पाटील यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.

    ग्रामस्थांची ठाम भूमिका : रस्ता त्वरित पूर्ण करण्यात यावा, तोपर्यंत रस्त्यावर मुरूम टाकून वाहतूक सुरू करावी, अन्यथा उपोषण मागे घेतले जाणार नाही. उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

    प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली नसल्यामुळे ग्रामस्थांत नाराजी आहे. “ही लढाई गावाच्या विकासाची व सुरक्षेची आहे. आम्ही मागे हटणार नाही,” असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

To Top