🌾 “आटपाडी मुलुखाचा इतिहास” ;आयु. विलास खरात
लेखक:विलास खरात
आटपाडी kd24newz; सांगली जिल्ह्यातील “आटपाडी” हे तालुक्याचे गांव असून प्राचीन व मध्ययुगीन पार्श्वभूमी असलेले इतिहास कालीन आटपाडी हे गांव सांगली जिल्ह्याच्या ईशान्येस आहे. अक्षांश १७ : २५ व पूर्व रेखांस ७४ : ५० वर वसलेले गांव आहे. सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्याच्या सीमा रेषेवरील आटपाडी हा तालुका आहे. त्याचे क्षेत्रफळ ८७१. ७ चौरस कि.मी. चे असून हवामान उष्ण व कोरडे आहे. तालुक्यात ५६ गांवे व वाड्या वस्त्या आहेत. आटपाडी तालुक्याच्या पूर्वेस सांगोला तालुका (सोलापूर), उत्तरेस माण (दहिवडी) व माळशिरस (सातारा-सोलापूर), दक्षिणेस कवठेमहांकाळ- तासगांव- खानापूर तालुके (सांगली) पश्चिमेस खानापूर तालुका तालुका (सांगली) व खटाव तालुका (सातारा) या जिल्ह्यातील तालुक्याच्या सीमारेषेच्या हद्दी आहेत.
पूर्वी आटपाडी हा मुलुख कायमस्वरूपी अवर्षण ग्रस्त, दुष्काळी छायेत असलेमुळे उजाड माळरानाचा पिवळसर कुसळी गवताचा, मुरमाड खडकाच्या मातीचा भाग होता. तालुक्याचा पूर्व भाग रब्बीचा व पश्चिम भाग खरीपाचा असे म्हणत असत. या भागातील पारंपारिक पीके ही ज्वारी, बाजरी, गहू, ऊस, कापूस, मका, खपली गहू, हायब्रीड इत्यादी पिके घेतली जात त्याच बरोबर हंगामा मध्ये मटकी, तूर, हुलगे, भुईमुग व भाजीपाला इत्यादी पीके सुध्दा घेत असत. (सध्या टेंभू योजनेच्या पाण्यामुळे डाळिंब, द्राक्षे, आंबे, शेवंगा इत्यादी फळ पीकाचे क्षेत्र वाढलेले आहे.) तालुक्याची लोकसंख्या १,३८,४५५ इतकी आहे (सन २०११ च्या जणगनने प्रमाणे) तालुक्याची उपविभागीय कार्यालये विटा (खानापूर) येथे असून आटपाडी तालुका हा खानापूर विधानसभा मतदार संघात असून सांगली हा लोकसभा मतदार संघ आहे.
पूर्वीच्या कालखंडात आटपाडी हे ऐतिहासिक गांव होते. साधारण मध्ययुगीन कालखंडामध्ये १३ किंवा १४ व्या शतकात आटपाडी नगरात भुईकोट किल्ला बांधलेला असावा. सदरचा किल्ला हा चंद्रकला नदीच्या किनाऱ्यावर वसलेला होता. सदर किल्याच्या चारी बाजूला वेशी, टेहळणी, बुरुज, दगडाची मोठी तटबंदीच्या भिंती बांधलेल्या होत्या. सदरच्या काळी सतत लढाया सुरु असत. गांवेच्या- गांवे लुटून बेचिराख केली जात असत. त्या वेळीस जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे आटपाडी गांवात अनेक घरात तळघरे, भुयारे, प्याव असलेचे दिसून येते. पाच मुघलशहानी एकत्र येऊन साधारण १४ व्या शतकात मुगी पैठण येथे बैठक घेऊन तह केला व ऐकमेका विरुद्ध लढाई न करता सलोख्याने व समोपचाराने राहणेचे ठरविण्यात आले. तहात ठरलेल्या अटी व नियमानुसार राज्य कारभार करणेचे ठरविण्यात येऊन त्यांनी प्रांत, सुभे, परगणे, गांवे व मुलुखाच्या हद्दी ठरवून आप-आपली आधिकृत राज्ये स्थापन केली होती. त्यानुसार आदिलशाही (विजापूर) निजामशाही (नगर)बरीदशाही (बिदर) इमादशाही (विदर्भ) कुतुबशाही (गोवळकोंडा) या पाच शहानी राजधानीची गांवे ठरवून राज्य कारभार सुरु केला होता असे सांगितले जाते.
पाच शहानी या मुलुखात इनामे, वतने, जहांगिरी, सुभे, परगणे इत्यादी देऊन त्या भागातील राजे, सरदार, इनामदार, वतनदार यांना आप-आपल्या राज्यात सामील करून घेतले होते. यांच्यापैकी जो मांडलिकत्व स्विकारत नसेल तर हे पाच शहा एकत्र येऊन त्यांचा किल्ला, मुलुख, गांवे लढाईत बेचिराख करून गांवे व किल्याची नासधूस करून तो मुलुख आपल्या कब्जात घेत असत. साधारण १५ व्या शतकात आटपाडीच्या भुईकोट किल्यावर आक्रमण करून किल्याची दुर्दशा केलेली असावी. त्या काळी आटपाडीचा किल्ला हा देवगिरीच्या यादव वंशातील राजाच्या ताब्यात होता असे सांगितले जाते. आज ही आटपाडी गांवात किल्याचे बुरुज व दगडी तटबंदी दिसून येते.
आटपाडी गांवच्या पूर्वेस एक बुरुज (हुडवा) हा तांबडा मारुती मंदिरा जवळ आहे तर दुसरा बुरुज गांवच्या पश्चिमेला श्री कलेश्वर मंदिरालगत आहे. आटपाडीच्या ओढ्या लगत ब्राम्हण घाटा जवळ दगडी पायऱ्या होत्या. त्याच्या लगतच चुन्यात बांधलेल्या दगडाच्या भिंतीचे अवशेष थोड्या फार प्रमाणात दिसून येतात. आटपाडी गांवात तळघरे, भुयारे, प्याव काही ठिकाणी आढळून येतात. त्या काळी अन्नधान्य व मौल्यवान वस्तू लुटू नयेत म्हणून घराच्या अंगणात किंवा परसदारात तळघरे व प्याव बांधणेत येऊन त्या मध्ये वस्तू व सामान ठेवणेत येत असत. गांवात रथ, हत्ती, घोडे, तोफा आणता येऊ नयेत म्हणून गांवात अरुंद बोळे, गल्ली, रस्ते हे सुरक्षितेसाठी ठेवणेत येत असत. त्यामुळे या सर्व बाबी वरून असे दिसून येते की, आटपाडी गांव हे इतिहास कालीन किल्याचे गांव असलेचे ठामपणे सांगता येईल.
आटपाडी या गांवाच्या नांवा संदर्भात काही मुद्याचा विचार केलेस असे दिसून येते की, आटपाडीच्या भुईकोट किल्यावर राष्ट्रकुट, शिलाहार,सातवाहन, चालुक्य आणि देवगिरीच्या यादव घराण्यातील राजांनी राज्य केलेचे सांगितले जाते. त्या काळी गांवात आठ पाडे होते. (वस्त्या) आठपाडे वरून आटपाडी हे गांवाचे नांव पडले असावे असे वाटते. दुसरे असे सांगितले जाते की, निसर्ग संपन्न, आटपाडी गांवच्या चंद्रकला नदीस निर्मळ वहाते पाणी असायचे. भुईकोट किल्याच्या आत गांव असलेमुळे प्रत्येकाच्या घरी व वाड्यात पाण्यासाठी आड (छोटी विहीर) पाडली जात असत. माणमातीची जमीन असलेमुळे आडास पाणी स्वच्छ व रुचकर असलेमुळे घरोघरी आडाच्या पाण्याचा वापर केला जात असे. पूर्वी गांवातील वस्त्यांना पाडे म्हणत असत. त्यामुळे गांवात आडाची (विहिरीची) संख्या भरपूर असलेमुळे आडपाडी वरून अपभ्रंश होऊन गांवाचे नांव आटपाडी पडले असावे असे संयुक्तरित्या वाटते आहे.
तरसवाडीच्या डोंगर रांगेजवळील मेंगाळवाडीच्या महादेवाच्या मंदिरापासून आटपाडीच्या ओढ्याचा उगम दिसून येतो. सदरचा ओढा हा घरनिकी, पिंपरी, जांभूळणी, घाणंद, कामथ या गांवाजवळून डबई कुरणात येतो, तिथून पुढे ओढ्याचा प्रवास आटपाडी गांवच्या हद्दीत प्रवेश करून श्री. आंबामाता मंदिर, ब्राम्हण घाट, बाजारपटांगण जवळून आटपाडी गांवास चंद्रकोरी प्रमाणे वळसा घालून, सागर मळा, कैकाडी डोह, पाटील मळ्याजवळून पुढे बोंबेवाडी गांवाजवळील माणनदीस मिळतो. डबई कुरणातून आटपाडीकडे येणाऱ्या ओढ्यास पूर्वीच्या काळी “चंद्रकला नदी” असे म्हणत असत. कारण आटपाडी गांवाला चंद्राच्या कोरीप्रमाणे वळसा घालून नदी वहात असलेमुळे तिस “चंद्रकला नदी” हे नांव पडलेले असावे. सातवहान या राजाच्या राजवटीत या नदीस चंद्रकला नदी म्हटले जात असावे. चंद्रकला नदी आटपाडी भागाची जीवन वाहिनी मानली जात होती.
आटपाडी गांवच्या ओढ्याबाबत दुसरा एक संदर्भ सांगितला जातो की, पुराणकाळी आटपाडीचा भाग हा दंडकारण्याचा, निसर्ग संपन्न भाग होता. पाऊस काळ भरपूर असलेमुळे आटपाडीच्या नदीस सतत वहाते पाणी असे. सदरच्या कालखंडात शुकमुनी हे हिमालयातून तप-साधना करून दक्षिण भागाकडे जात असताना त्यांना आटपाडी गांवचा निसर्ग संपन्न भाग आवडला होता. त्यामुळे शुकमुनी हे आटपाडी गांवच्या भूमीत काही दिवस वास्तव्यास होते. शुकमुनी हे सूर्योदयापूर्वी तप साधना करून चंद्रकला नदीच्या स्वच्छ व वाहत्या निर्मळ पाण्यात स्नान करून सूर्योदयावेळी सूर्यनारायणास नदीच्या पाण्याचा जलाभिषेक करून पूजा, अर्चा वेळी मंत्रोचार करून सूर्यनमस्कार करीत असत. सुर्योदयावेळी वातावरण मंत्रमुग्ध होऊन प्रसन्नता लाभत असे. त्यामुळे शुकमुनी या महान तपस्वीचे पदकमल आपल्या भूमीस व गांवच्या चंद्रकला नदीस लाभलेमुळे आटपाडी गांवची नदी ही शुकमुनीच्या पदस्पर्शाने पावन झालेमुळे शुकमुनी ओढा हे नाव सुरु झाले असावे. त्यावरून शुकमुनी ओढ्याचा अपभ्रंश होऊन शुकमुनीवरून शुक्र ओढा हे नांव प्रचलित झालेचे असावे असे वाटते.
आटपाडी या भागावर चंद्रगुप्त मौर्य, शक, सातवाहन, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, आदिलशाही, म्हसवडचे राजे माने, औंधचे पंतप्रतिनिधी, आटपाडीचे चव्हाण-देशमुख या राजघराण्याची राजवट आटपाडी मुलुखावर होती. याबाबत शिलालेख ऐतिहासिक दस्तऐवज या कागदपत्रावरून दिसून येते. आटपाडी भागाचा मुलुख १६ व्या शतकात विजापूरच्या (कर्नाटक) आदिलशाहीकडे होता. सदरचा मुलुख शिवशाहीत आलेनंतर सातारचे छत्रपती शाहू महाराज यांनी आटपाडी गांवची सरदेशमुखी, म्हसवडचे सरदार माने यांना दिलेली होती. त्यानंतर सोळाव्या शतकाच्या अखेरीस कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी श्री. परशुराम पंतांना कराड, आटपाडी व औंध या परगण्याची जहागिरी देऊन पंतप्रतिनिधी पद हे बहाल केलेले होते. औंध संस्थानची राजधानी पूर्वी कराड होती. पेशवाईमध्ये औंध संस्थानातील काही गांवे कमी केलेली होती. सन १८१८ साली पेशवाईचा अस्त झालेनंतर ब्रिटिशाची राजवट सुरु झाली. इंग्रजांनी सन १८५४ साली त्यांच्या राज्य कारभारांच्या सोयीसाठी कराड हा परगणा पंतप्रतिनिधी यांचेकडून काढून घेतला व त्या बदल्यात औंध संस्थानसाठी ७२ गांवे व ३९ वाड्या- वस्त्या देण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये आटपाडी हा परगणा प्रामुख्याने पुन्हा औंध संस्थानला जोडण्यात आलेला होता. त्या वेळीस औंध संस्थानने आटपाडीस “महाल” म्हणून तालुक्याचा दर्जा देऊन तालुक्यासाठी ३२ गांवे व वाड्या- वस्त्या सामाविष्ट केलेल्या होत्या. त्यामुळे आटपाडी हा भाग औंध संस्थानच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे औंध संस्थानने आटपाडी येथे राजवाडा व कार्यालयीन इमारती उभारलेल्या होत्या. औंध संस्थानने सन १९३९ साली नवीन राज्यघटना तयार करून औंध संस्थानने प्रथमच लोकशाही पद्धतीने कारभार सुरु केलेला होता.
सन १९४८ साली भारत देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य प्राप्त झालेनंतर सन १९४८ साली आटपाडी हा भाग सोलापूर जिल्ह्यास जोडनेत आलेला होता. परंतु प्रशासकीय बाबीमुळे व क्रांतीकारकांना आश्रय व साथ देणारा आटपाडी हा भाग सन १९४९ नंतर दक्षिण सातारा जिल्ह्यास जोडण्यात आलेला होता. सन १९५२ साली सांगली जिल्ह्याची स्थापना झाली. स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मितीनंतर आटपाडी हा भाग सांगली जिल्ह्यात समाविष्ठ करणेत आलेला होता. सन १९६० पर्यंत आटपाडी तालुका स्वतंत्र होता. परंतु सन १९६० नंतर आटपाडी हा भाग खानापूर तालुक्यास जोडण्यात आलेला होता.
त्यामुळे आटपाडीची प्रशासकीये कार्यालये विटा (खानापूर) या तालुक्यास जोडणेत आलेली होती. आटपाडीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय हे वाळवा तालुक्यास जोडणेत आलेले असलेमुळे आटपाडी, खरसुंडी, करगणी, दिघंची या गांवातील आठवडे बाजार व यात्रा या मधील जमा होणारे कर हे वाळवा मार्केट कमिटी जमा होत असत. त्यामुळे प्रशासकीय कामासाठी विटा येथे जावे लागत होते व मार्केट कमिटीच्या कामासाठी इस्लामपूर येथे जावे लागत असलेमुळे शेतकरी व लोकांची अत्यंत गैरसोय होत असलेमुळे सन १९६५ साली आटपाडी तालुक्याची स्वतंत्र निर्मिती शासनास करावी लागलेली होती.
सह्याद्रीच्या डोंगररांगे लगत विस्तृत पठाराचा मोठा भूभाग आहे. त्या पठाराच्या रचनेत शंभू महादेवाची डोंगर रांग आहे. त्या डोंगर रांगेपासून प्राचीन दंडकारण्यचा भूभाग आहे. या पठाराच्या भू-प्रदेशात आटपाडी भागाचा समावेश आहे. शंभू महादेवाच्या उपडोंगर रांगा या आटपाडी भागातील शुक्राचार्यांच्या डोंगर रांगेला मिळतात. पूर्वी आटपाडी हा भाग दंडकारण्याचा, पौराणिक, ऐतिहासिक असलेचे संदर्भ आढळून येतात. आटपाडी गांवात पाच परमेश्वर देवतांच्या मंदिराची स्थाने आहेत. लोकांच्या भावनिक, आध्यात्मिक श्रद्धेची आदरयुक्त श्रद्धा स्थाने आहेत. त्यामुळे असे म्हटले जाते की, ! “ज्याशी न घडे काशी त्यांनी यावे ! आटपाडीशी”! त्यावरून आटपाडी गांवच्या पाच परमेश्वरांचे धार्मिक महत्व अधोरेखीत होते. पाच परमेश्वर म्हणजे, श्री उत्तरेश्वर, श्री कल्लेश्वर, श्री परमेश्वर, श्री सोमेश्वर, श्री नंदीकेश्वर ही धार्मिक व पूजनीय देवस्थाने आहेत.
आटपाडी तालुक्यातील काही गांवामध्ये पुराणकालीन, शिवकालीन मंदिरे आहेत. त्यामध्ये करगणी येथील श्री लखमेश्वर मंदिर, शुक्राचार्य मंदिर, श्री सिद्धनाथ मंदिर (खरसुंडी), कुरुंदवाडीचे बिरोबा मंदिर, झरे येथील भवानी मंदिर, दिघंचीचे महादेव मंदिर, पुजारवाडीचे सोनारसिध्द मंदिर, बोंबेवाडीचे लक्ष्मीआईचे मंदिर, आवळाईचे मरिमाता मंदिर, त्याचबरोबर प्रसिध्द असे रामदरा, घोडेखूर, कावडीचा डोंगर, घाणंद कारदेवाचा डोंगर, हिवतडचा घोडा, खरसुंडीचा कवरठाण डोंगर, बानुरगड येथील शूरवीर बहिर्जी नाईक समाधी इंग्रजकालीन राजेवाडी व बुद्धीहाळ तलाव, आटपाडी तलाव, खरसुंडीची चैत्री व पौषी यात्रा, या भागातील डोंगरी घाटामध्ये भिवघाट, चिंचघाट, बलवडीघाट, चिंचाळेघाट, मुढेवाडीघाट, तरसवाडीघाट आहेत. आटपाडी व दिघंची गांवाचे शिरळोबा प्रसिद्ध आहेत.
आटपाडी गावांमध्ये औंध संस्थानकालीन जुना सरकारी वाडा, स्वतंत्रपूर येथील खुली कैद्याची वसाहत, डबई कुरण, शुक्र ओढा, गावची जुनी अरुंद बोळे, खादी भंडार, सन १९४२ साली बांधलेली श्री भवानी विद्यालय, सन १९३७ साली स्थापलेली म्युनिसिपल कार्यालयाची इमारत अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाची ठिकाणे या भागात आहेत. त्याचप्रमाणे गजी नृत्य ढोल, ब्रॉस बँन्ड व पारंपारिक वाद्य ही संस्कृती व परंपरा जपणारा हा भाग आहे. तसेच आटपाडी गांवचा शनिवारचा शेळ्या- मेंढ्यांचा बाजार प्रसिद्ध आहे. बाजार पटांगण हे ऐतिहासिक ठिकाण आहे.
आटपाडी गाव व तालुक्यातून वाहणारे नदी, ओढे, नाले, वगळी या भागातील लोकांसाठी जीवन वाहिन्या आहेत. आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेस असणारी शुक्राचार्याची डोंगररांग ही पूर्व व पश्चिमेकडे जाते. ती हिवतड , भिवघाट, नेलकरंजी, खरसुंडी, घरनिकी, पिंपरी, विभूतवाडी, तरसवाडी, गारोडी, गुळेवाडीच्या पुढे शंभू महादेवाच्या डोंगर रांगे कडे जाते. त्यामुळे वरील गावच्या डोंगर रांगेपासून व आसपासच्या भागातून लहान वगळी नाल्याचे वाहते पाणी पुढे त्या गावाच्या नावाने ओढे म्हणून ओळखले जातात. ते ओढे,नाले, वगळी या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत येतात. माणनदी या भागाची महत्त्वपूर्ण नदी ही शंभू महादेवाच्या डोंगररांगेच्या कुळकजाई जवळील सीतामाईच्या डोंगररांगात उगम पावते. ती माण देशाची भाग्यवर्धिनी आहे. म्हणून तिला माणगंगा नदी असे म्हणतात. माणगंगा नदीच्या तीरावर म्हसवड, राजेवाडी, लिंगीवरे, दिघंची, कौठळी, बोंबेवाडी, बलवडी, नाझरे, अकोला (वासूद) वाढेगांव इत्यादी गावे येतात. पुढे माणगंगा नदी ही सरकोली गावाजवळील भीमा नदीस मिळते.
खटाव तालुक्यातील गारोडी जवळील डोंगर रांगेतून नाले व वगळीचा उगम होतो. पुढे तो तरसवाडीच्या घाटातून विभूतवाडीच्या पश्चिमेकडे संगम होतो. त्या ओढ्यास थोरला ओढा म्हणत असत. गारोडी, तरसवाडी, गुळेवाडी च्या भागातून येणाऱ्या वगळी, नाले यांचे स्वरूप पुढे विभूतवाडीच्या ओढ्यात होते. पुढे हा ओढा विभूतवाडी, कुरुंदवाडी, झरे, वाक्षेवाडी, निंबवडे (तलाव), गळवेवाडी, आवळाई विठलापूर हून पुढे माणनदीस हा ओढा मिळतो.
खरसुंडी भागातून दोन ओढे वाहतात. करंजवडा ओढ्याचा उगम हा बलवडी घाटाच्या पायथ्यापासून होतो. खरसुंडीतून मिटकी साठवण तलाव, बनपुरी व पुढे आटपाडी कडे येणाऱ्या ओढ्यास मिळतो. त्याचप्रमाणे खरसुंडीचा दुसरा ओढा हा बलवडी घाटाच्या उत्तर बाजूकडून “हत्तीनाळ” पासून खरसुंडी गावाजवळून तलावात जातो. तिथून पुढे तो जानकरवस्ती, मेटकरवाडी तलावात येतो. दोन्ही ओढे एकत्रित आटपाडी तलावाकडे येतात तसेच आटपाडी गावच्या खवणीचा उगम हा भिंगेवाडी पासून सुरु होतो तो पुढे गवरचिंच मळा, भूरुकुड मळा, पाटील मळा, बडेखानापासून आटपाडी ओढ्यास मिळतो.
नांगरेमळा, धांडोरेमळा, पुजारवाडी, देशमुखवाडी ओढ्याचा उगम मुढेवाडीच्या घाटाच्या जवळून आहे. हे सर्व ओढे आटपाडी ओढ्यास व माणनदीस मिळतात. शुक्राचार्यच्या डोंगररांगेच्या पायथ्यापासून हिवतड गावच्या ओढ्याचा उगम आहे. तो ओढा हिवतड, करगणी, माळेवाडी, शेटफळे या गावाजवळून जातो. पुढे तो ओढा बुद्धिहाळ तलावात मर्ज होतो. तसेच पात्रेवाडीचा ओढा चिंच घाटापासून व आसपासच्या भागाच्या वगळी, नाले यातून येणाऱ्या वाहत्या पाण्यातून पात्रेवाडीच्या ओढ्याकडे येतात. पात्रेवाडी गावाजवळून रेबाई तलावात मर्ज होऊन त्या तलावाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी हे शेटफळे गावातून आलेल्या ओढ्यास मिळतात. हे ओढ्याचे पाणी बुद्धीहाळ तलावात जाते. तसेच तडवळे गावच्या आसपास भागातून निघणाऱ्या लहान वगळी, नाले पुढे माळेवाडी गावाजवळील ओढ्याच्या पात्रात मिळतात. पुढे माळेवाडीचा ओढा हा शेटफळे गावच्या ओढ्यास मिळतो. माळेवाडीच्या तलावातून बनपुरी ओढा वाहतो. नेलकरंजी ओढ्याचा उगम हा रामदऱ्यापासून सुरू होतो व दुसरा ओढा हा घोडेखूरापासून सुरु होतो. तो ओढा पुढे नेलकरंजी, गोमेवाडी, करगणी, शेटफळे गावावरून बुद्धीहाळ तलावाकडे जातो.
माडगूळे गावास दोन ओढे येतात. एका ओढ्याचा उगम तडवळे गावच्या भागातून नाले, वगळी यापासून येणाऱ्या पाण्यापासून ओढा निर्माण होतो. पुढे हा ओढा उबाळेवस्ती, मरगळेवस्ती, गोंदिरा, दाईंगडेवस्ती, तळेवस्ती वरून माडगूळे ओढ्याकडे येतो. दुसरा ओढा डोंगरवस्ती, तलाव पासून लेंगरेवाडीतून तामजाई तलाव येतो. तेथून तो माडगुळे गावात दोन्ही ओढ्याचा संगम होतो. पुढे तो ओढा बलवडीच्या बेलवन नदीच मिळतो. आटपाडी तालुक्यातील ओढ्या बाबत थोडक्यात सारांश दिलेला आहे.
तसेच माडगुळे गावचे सरपंच यांनी श्री खंडोबा देवस्थान बाबत अख्यायिका सांगितली की, १६ व्या शतकात विजापूरच्या आदिलशहाचे राज्य असताना, कर्नाटकातील विजापूरच्या उत्तरेस ३० कि.मी. अंतरावर गाव आहे. या हिप्परगी गावात राऊत रायाचे मंदिर होते. हिप्परकर लोकांनी राऊतराया या कुलदैवताचे गावात मंदिर बांधले होते. या गावात खंडारजी व भंडारजी या नावाचे दोन भाऊ त्या गावात राहत असत. त्यांना लक्ष्मी नावाची अत्यंत सुंदर, सुलक्षणी अशी बहीण होती. त्या लक्ष्मीच्या लावण्यरुपाची माहिती विजापूरच्या आदिलशहाला समजलेनंतर त्यांनी दोन भावाकडे लक्ष्मीची मागणी केलेली होती. परंतु दोन्ही भाऊ स्वाभिमानी व शूर असलेमुळे आदिलशहाची मागणी दोन्ही भावांनी फेटाळून लावलेली होती. आदिलशहाला या गोष्टीचा राग आलेमुळे त्याने आपले सैन्यदल पाठवून खंडारजी व भंडारजी यांच्याशी युद्ध केले. सदर युद्धात आदिलशहाच्या सैन्यापुढे आपला निभाव लागत नाही, आपला पराभव होणार हे लक्षात आलेनंतर खंडारजी व भंडारजीने आपल्या बहिणीस समजावून सांगितले व वाड्याच्या परसदारात जमीनीखाली जवस ठेवण्यासाठी भुयार व प्याव तयार केलेले होते त्या जवसाच्या प्यावामध्ये लक्ष्मीस लपवून ते दोघे भाऊ पळून माडगूळे या गावी येवून राहिले होते.
खंडारजी व भंडारजी यांचे राऊतराया म्हणजे खंडोबा हे त्यांचे कुलदैवत असलेमुळे त्यांनी खंडोबा देवाचे मंदिर हे माडगूळे या गावी पाणी असणाऱ्या तलावाजवळ स्थापन केले. याच खंडोबा देवाला राऊत राया देखील म्हणतात. त्याच वेळी दोन्ही भावांनी ईश्वर व पार्वती मंदिराची ही स्थापना केली. पूर्वी सदर मंदिर हे दगडी बांधकामाचे कर्नाटक शैलीतील होते. दरवर्षी खंडोबाची यात्रा ही मार्गशीष महिन्यात चंपाषष्टीला भरते. याबाबतीत तालुक्यातील अनेक मंदिरांना व वास्तूंना इतिहास आहे, याबाबत संशोधन होणे गरजेचे आहे.
आटपाडी तालुक्याने साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण, संस्कृती जपण्याचे प्रामुख्याने कार्य केलेले आहे. आटपाडीच्या वैभवशाली भूमीने अखिल भारतीय साहित्य संमेलनास पाच अध्यक्ष दिलेले आहेत. त्यामध्ये श्री भवानराव पंतप्रतिनिधी (इंदूर- मध्यप्रदेश १९३५) श्री. ग. दि. माडगूळकर (यवतमाळ १९७३), श्री. व्यंकटेश माडगूळकर (आंबेजोगाई- बीड १९८३), श्री डॉ. शंकरराव खरात (जळगाव १९८४), श्री ना.स.इनामदार (सन १९९७ अहमदनगर) या साहित्यकांच्या ग्रंथाची जगातल्या साहित्य रसिकांनी व प्रेमींनी नोंद घेतलेली आहे. तसेच या भागात अनेक कर्तुत्वान महापुरुष लाभलेले आहेत. त्यांनी समाजकारण, राजकारण, क्रीडा, साहित्य कला, कृषी, शिक्षण इत्यादी क्षेत्रात जडणघडण करून अभूतपूर्व कार्य केलेले आहे. त्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. अशा या आटपाडी भागाचा थोडक्यात इतिहास आपणापुढे सादर केलेला आहे.
---
🔖 संदर्भ ग्रंथ:
मुलखा वेगळा राजा – बॅ. आप्पा पंत
माणदेशी साहित्य – डॉ. कृष्णा इंगोले
माणदेशाचे मानबिंदू – आयु. विलास खरात
विविध पुराण व लेख
---
📍लेखक: आयु. विलास खरात, आटपाडी, जि. सांगली
📞 संपर्क: ९२८४०७३२७७
🖋 📰 प्रसिद्धी,प्रस्तुती:संपादाक सुधीर पाटील, पत्रकार, आटपाडी.📲 9420676273