Sanvad News आटपाडीतील आबासाहेब खेबुडकर कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षापूर्व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात

आटपाडीतील आबासाहेब खेबुडकर कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षापूर्व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात

Admin

 विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारे मार्गदर्शन : वेळेचा सदुपयोग हाच यशाचा मंत्र ; प्रा.दिलीप जाधव



आटपाडीतील आबासाहेब खेबुडकर कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षापूर्व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न!


आटपाडी kd24newz :ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही न्यूनगंडाला बळी न पडता आत्मविश्वासाने पुढे जावे. योग्य नियोजन, शिस्तबद्ध अभ्यास आणि वेळेचा अचूक उपयोग केल्यास कोणतेही ध्येय अशक्य राहत नाही, असे प्रतिपादन बळवंत कॉलेज, विटा येथील प्रा. दिलीप जाधव यांनी केले.

आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब खेबुडकर कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या परीक्षापूर्व मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, अभ्यासाला योग्य दिशा देणे आणि परीक्षेचा ताण दूर करणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री भवानी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचाही सहभाग लक्षणीय होता.

प्रा. जाधव म्हणाले की, परीक्षा ही भीतीची गोष्ट नसून आपल्या क्षमतेची ओळख करून देणारी संधी आहे. वेळ कुणासाठीही थांबत नाही, म्हणून वेळ नावाच्या घोड्यावर स्वार होऊन आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची तयारी विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. नियमित अभ्यास, सकारात्मक विचारसरणी आणि सातत्य हे यशाचे मुख्य आधारस्तंभ आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी त्यांनी विषयानुसार अभ्यासाची आखणी, वेळापत्रक तयार करण्याची पद्धत, अभ्यासातील त्रिसूत्री, उत्तरपत्रिका लेखनाचे तंत्र, आहार-विहाराचे महत्त्व तसेच मानसिक ताणतणावावर मात करण्याचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. परीक्षेच्या काळात शांत मन ठेवून आत्मविश्वासाने प्रश्नपत्रिकेला सामोरे जाण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान शाखेचे विभागप्रमुख प्रा. रणजीत पौळ होते. प्रारंभी त्यांच्या हस्ते प्रा. दिलीप जाधव यांचा शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सी.ई.टी. व स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख सुभाष पाटील यांनी केले. यावेळी प्रा. दादासाहेब मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सूत्रसंचालन प्रा. श्रीकृष्ण पडळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रमोद गायकवाड यांनी मानले.या मार्गदर्शनपर कार्यक्रमास आबासाहेब खेबुडकर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांकडून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

To Top