Sanvad News आटपाडीत जयभवानी नगरात मध्यरात्री चोरीचा डाव हाणून पाडला!

आटपाडीत जयभवानी नगरात मध्यरात्री चोरीचा डाव हाणून पाडला!

Admin

 आटपाडीत जयभवानी नगरात मध्यरात्री चोरीचा डाव हाणून पाडला!

स्थानिक नागरिकांची सतर्कता; सीसीटीव्हीत पाच संशयितांची हालचाल, पोलिसांकडून तात्काळ कारवाईचे आश्वासन!

आटपाडी (kd24newz ):आटपाडी शहरातील कोर्टाच्या पाठीमागे जयभवानी नगर परिसरात काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने आलेले पाच संशयित चोर स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे पळवून लावण्यात आले. बडवे यांचे बंद घर फोडून चोरी करण्याचा उद्देश होता.

याच परिसरात वास्तव्यास असलेले सावंत वकील यांनी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले असता पाच संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ बबलू जगताप यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली.

माहिती मिळताच बबलू जगताप यांनी काही सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. चोरीचा प्रकार घडत असलेल्या ठिकाणी पोहोचून त्यांनी चोरांचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेत संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले. जरी चोर हाती लागले नसले तरी स्थानिकांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी चोरी टळल्याचे नागरिकांचे मत आहे.

यानंतर घटनेची शहानिशा करण्यासाठी दत्ता मेटकरी यांच्या घरास लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये पाचही संशयितांची परिसरातील हालचाल स्पष्टपणे कैद झाल्याचे समोर आले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या महिन्यातील हा तिसरा चोरीचा प्रयत्न असून, यापूर्वीही अशाच स्वरूपाचे प्रकार परिसरात घडले आहेत.

या सर्व घटनेची सविस्तर माहिती बबलू जगताप यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेत तात्काळ सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, घटनेचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित परिसराची पोलिसांनी पाहणी केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची दिशा ठरवली जात आहे.

दरम्यान, वारंवार घडणाऱ्या चोरीच्या प्रयत्नांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, रात्रीच्या गस्तीत वाढ करावी तसेच संशयित टोळ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

विडिओ पहा...






To Top