संजूचं वादळ, विंडीजचा काटा काढला! टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक; 5 मार्चला वानखेडेवर इंग्लंडशी महासंग्राम!
आटपाडी kd24newz : मुंबई.टी-२० क्रिकेटमध्ये दबावाखाली कसं खेळायचं, याचं जिवंत उदाहरण देत टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा कडवा प्रतिकार मोडीत काढत टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत दणदणीत विजय मिळवला. १९६ धावांचं आव्हान समोर असताना सामना क्षणभर विंडीजच्या बाजूने झुकलेला असतानाच संजू सॅमसनने वादळी खेळी साकारत सामना भारताच्या बाजूने कलवला. या विजयासह भारताने सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलं असून आता ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध थरारक लढत रंगणार आहे.
विंडीजचा डोंगर, भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार....
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने संयमी पण ठोस सुरुवात केली. कर्णधार शाय होप आणि रोस्टन चेस यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचत डावाचा पाया मजबूत केला.मात्र, त्यानंतर वरुण चक्रवर्तीने पहिलं यश मिळवत भारताला सामन्यात परत आणलं. मधल्या षटकांत जसप्रीत बुमराहने १२व्या षटकात दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत सामन्याचं चित्रच पालटलं.
डावाच्या अखेरीस जेसन होल्डर आणि रोवमॅन पॉवेल यांनी पाचव्या विकेटसाठी ७६ धावांची जबरदस्त भागीदारी करत विंडीजचा स्कोअर १९५ धावांपर्यंत नेला. होल्डरने २२ चेंडूत नाबाद ३७, तर पॉवेलने १९ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. भारताकडून बुमराहने २, तर हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
अभिषेक–ईशान फ्लॉप, पण संजूचा तुफान आगमन....
१९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात संमिश्र राहिली. अभिषेक शर्मा (१०) आणि ईशान किशन (१०) लवकर बाद झाल्याने दडपण वाढलं. मात्र दुसऱ्या टोकाला उभा असलेला संजू सॅमसन आत्मविश्वासाने खेळत राहिला.
अवघ्या २६ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत संजूने भारतीय डावाला वेग दिला. १० षटकांनंतर भारत ९८/२ अशा मजबूत स्थितीत होता. सूर्यकुमार यादव १८ धावा करून बाद झाला, पण त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू यांनी डाव सावरत धावगती वाढवली. तिलकने १५ चेंडूत २७ धावांची झंझावाती खेळी केली.
शेवटच्या षटकात संजूचा कहर, भारताचा विजय....
अखेरच्या पाच षटकांत ५० धावांची गरज असताना मैदानात हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन होते. १९व्या षटकात हार्दिक बाद झाला आणि समीकरण १० चेंडूत १७ धावांवर येऊन ठेपलं. थरार टोकाला असतानाच संजू सॅमसनने अखेरच्या षटकात संयम आणि आक्रमकतेचं अप्रतिम मिश्रण दाखवत भारताचा विजय निश्चित केला.
सेमीफायनलची रणधुमाळी : भारत विरुद्ध इंग्लंड.....
या विजयामुळे भारताचा आत्मविश्वास शिखरावर पोहोचला असून टी-२० विश्वचषक २०२६ चा सेमीफायनल सामना ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या या महासंग्रामाकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं असून, ‘संजूचं वादळ’ पुन्हा एकदा वानखेडेवर घोंघावणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
