Sanvad News शिक्षक बँकेची जुनी इमारत शिक्षक हितासाठीच वापरा; अन्यथा आंदोलनाची ठिणगी आटपाडीतून!

शिक्षक बँकेची जुनी इमारत शिक्षक हितासाठीच वापरा; अन्यथा आंदोलनाची ठिणगी आटपाडीतून!

Admin

 शिक्षक बँकेची जुनी इमारत शिक्षक हितासाठीच वापरा; अन्यथा आंदोलनाची ठिणगी आटपाडीतून!

एक अंकी व्याजदर, दोन अंकी डिव्हीडंटच्या घोषणांनी सत्ता मिळवली; आता सभासदांच्या हिताला प्राधान्य द्या — श्याम ऐवळे

आटपाडी kd24news ; दि. २६ : शिक्षक बँकेच्या जुन्या इमारतीचा वापर शिक्षक, विद्यार्थी आणि सभासदांच्या हितासाठीच करण्यात यावा. या इमारतीची विक्री अथवा अन्य कारणासाठी विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाची पहिली ठिणगी आटपाडीतून पडेल, असा इशारा शिक्षक समितीचे तालुका नेते श्याम ऐवळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

ऐवळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘एक अंकी व्याजदर, दोन अंकी डिव्हीडंट’ या घोषणेच्या जोरावर सत्तेवर आलेल्या सत्ताधारी मंडळींनी सभासदांच्या नफ्यातून गरज नसताना केवळ स्वार्थासाठी नवीन इमारत उभारली असून सभासदांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे. सध्या बँकेतील नोकरभरती आणि आर्थिक वाटणीच्या मुद्द्यावरून दोन गट निर्माण झाले असून, दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात संघर्षाचे चित्र निर्माण करून सभासदांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शिक्षक बँक ही नोकरदार सभासदांची आणि शंभर टक्के वसुली प्राप्त करणारी बँक असताना बुडीत कर्ज निधीची आवश्यकता काय? असा सवालही ऐवळे यांनी उपस्थित केला. संगणक दुरुस्ती, इमारत दुरुस्ती तसेच विविध समारंभांच्या नावाखाली झालेल्या खर्चावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा निधी सभासदांच्या डिव्हीडंटसाठी वापरला असता तर त्याचा थेट फायदा सभासदांना झाला असता, असा दावा त्यांनी केला.

जुन्या इमारतीत शिक्षक हिताचे उपक्रम राबवा....

शिक्षक बँकेची जुनी इमारत ही केवळ मालमत्ता म्हणून न पाहता तिचा उपयोग शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व्हावा, अशी मागणी ऐवळे यांनी केली आहे. जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शिक्षकांच्या मुलांसाठी ग्रंथालय व निवासाची सोय, दुसऱ्या मजल्यावर विविध प्रशासकीय सेवांच्या अभ्यासासाठी सुविधा, तर तिसऱ्या मजल्यावर स्वयंरोजगाराच्या विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण केंद्र सुरू करता येऊ शकते, असे त्यांनी सुचविले.

तसेच शिक्षक भवनाच्या धर्तीवर शिक्षकांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देत ही वास्तू सांगली जिल्ह्यातील दिवंगत शिक्षक नेत्यांच्या स्मृती जपणाऱ्या आणि शिक्षक उपयोगी उपक्रमांचे केंद्र बनवावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

शिक्षक बँकेच्या जुन्या इमारतीचा उपयोग शिक्षक हितासाठीच व्हावा, यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षक सभासदांनी एकत्रितपणे आवाज उठवावा, असे आवाहनही ऐवळे यांनी केले. जुन्या इमारतीची विक्री करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास त्याविरोधात आंदोलन उभारले जाईल आणि त्याची पहिली ठिणगी आटपाडीतून पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी तालुकाध्यक्ष इंताब इनामदार, सरचिटणीस जनार्दन मोटे, जिल्हा संघटक संजय कबीर, महिला कोषाध्यक्ष अनिता जाधव, महिला सरचिटणीस नीता देवडकर, पूजा मोटे, संचालक श्रीकांत राजे-कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार, प्रवीण बाड, दीपक कुंभार, हैबतराव पावणे, ज्योतीराम सोळसे, दिनेश माने, सचिन सासणे, नाना झुरे, रावसाहेब देवडकर, काकासो पाटील, सर्जेराव पुजारी, गणेश मोटे, सत्यवान मोटे, भास्करराव डिगोळे आदी उपस्थित होते.

To Top