फुले एज्युकेशन तर्फे 13 वा सत्यशोधक गृहप्रवेश सोहळा
आटपाडी kd24newz :पुणे – फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशनल अॅन्ड सोशल फाउंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे थोर समाजसुधारक आणि सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांच्या महात्मा दिनानिमित्त 13 वा सत्यशोधक गृहप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा दिनांक 11 मे 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता पंतप्रधान आवास योजना A1008ESI अंतर्गत मोहननगर, आकुर्डी, पुणे येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या भटजीविरहित पद्धतीने गृहप्रवेशाचा विधी पार पडणार असून विधीकर्ते म्हणून महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य आणि संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक कार्यभार सांभाळतील.
कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती गिरीजाबाई चंद्रकांत बनकर, विक्रम व अश्विनी बनकर आणि चि. संस्कार व उत्कर्ष विक्रम बनकर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
या प्रसंगी बोलताना विक्रम बनकर म्हणाले की, “महात्मा फुले यांनी अर्धांगवायू झाल्यानंतरही डाव्या हाताने ग्रंथ लेखन करून बहुजन समाजासाठी भटजी मुक्त मार्गदर्शन केले. कोणत्याही विधीसाठी विशिष्ट व्यक्तीची गरज नाही हे त्यांनी स्पष्ट केले होते. आजच्या विज्ञानयुगात आपण सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेणे ही काळाची गरज आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्याची सुरुवात करत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे.”
या सत्यशोधक गृहप्रवेश सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.