खरसुंडी यात्रेत पोलीस मित्रांची उल्लेखनीय साथ; आटपाडी पोलिसांकडून संघटनेचा विशेष सन्मान व गौरव
आटपाडी kd24newz::खरसुंडी (ता. आटपाडी) येथे पार पडलेल्या वार्षिक चैत्री यात्रेत ‘पोलीस मित्र संघटना’ने दिलेल्या मोलाच्या योगदानामुळे यात्रा यशस्वीपणे, शांततेत आणि शिस्तबद्धरीत्या पार पडली. या सहभागाचे विशेषत्व जाणून आटपाडी पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व पोलीस मित्रांचा सन्मान करण्यात आला.
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक मा. संतोषदादा चौधरी, राष्ट्रीय जनसंपर्कप्रमुख मा. गजानन भगत साहेब, तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. सुनील भाऊ पाटील यांच्या आदेशानुसार आणि पोलीस मित्र सांगली जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख पांडुरंग हातेकर यांच्या नेतृत्वाखाली सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील ५० महिला व पुरुष पोलीस मित्रांनी यात्रेत सक्रिय सहभाग घेतला.
यात्रेदरम्यान गर्दीचे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, हरवलेली मुले, वयोवृद्धांची मदत, तसेच आपत्कालीन सेवा अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत तत्परतेने पार पाडल्या. त्यांच्या कार्यामुळे पोलीस प्रशासनावरचा ताण कमी झाला आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
ही उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेता आटपाडी पोलीस ठाण्याच्यावतीने विशेष कार्यक्रम आयोजित करून पोलीस मित्रांचा सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक रमेश जाधव, यांच्या हस्ते सर्व पोलीस मित्रांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव, विजेंद्रसिंह बायस, पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात, महिला पोलीस अंमलदार सुजाता जगदाळे यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमात पोलीस मित्र संघटनेने या मान्यवरांचा विशेष सन्मान करून त्यांचे आभार मानले. पोलीस निरीक्षक बहिर व जाधव यांनी आपल्या भाषणात म्हटले, “पोलीस मित्रांच्या सक्रिय सहभागामुळे आमच्यावरचा ताण हलका झाला आणि यात्रा व्यवस्थापन अधिक सुलभ झाले. त्यांचे समर्पण वाखाणण्याजोगे आहे.”
या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील स्नेह व सहकार्याचे अद्वितीय उदाहरण घडले असून, भविष्यातही अशाच उपक्रमांत पोलीस मित्रांचा सहभाग अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.