प्रतिभा गजरमल, यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
श्रीलंका येथे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार' प्रदान
सातारा दि. २८ सातारा येथील शिक्षिका, कवियत्री, गीतकार. पटकथा लेखिका, प्रतिभा गजरमल,सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल कोरेगाव यांना श्रीलंकेत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार' नुकताच प्रदान करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल, पाचव्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात, त्यांना हा जागतिक सन्मान मिळाला.
सातारा, कोरेगाव तालुक्यातील,सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल कोरेगाव येथील इंग्लिश मिडीयम विभाग प्रमुख, साहित्यिक आणि कवियत्री प्रा.प्रतिभा गजरमल यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या
प्रदीर्घ शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक योगदानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून, त्यांना नुकताच श्रीलंकेत प्रतिष्ठित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. यापूर्वी त्यांना दुबई येथेही अशाच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते, हे विशेष. हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा १७ आणि १८ मे रोजी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने श्रीलंका येथील कोलंबो शहरात आयोजित पाचव्या आंबेडकरवादी विश्व साहित्य
संमेलनात संपन्न झाला. श्रीलंकेच्या सरकारचे मुख्य सचिव के. एम. जयतूंगा यांच्या प्रमुख उपस्थितीत, संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक डॉ. विद्याधर बनसोड, स्वागताध्यक्ष कथाकार प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील, जागतिक आंबेडकरवादी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे, उपाध्यक्ष डॉ. विलास तायडे, विधीतज्ञ अॅड. भूपेश पाटील आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. अशोक इंगळे यांसारख्या मान्यवरांच्या हस्ते मा. प्रतिभा यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्रीलंकेतील
बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत त्रिशरण पंचशील पठणाने आणि महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी बोलताना महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे यांनी, ङ्गडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैश्विक विचार संपूर्ण जगात पोहोचवणे हाच या संमेलनाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे, असे प्रतिपादन केले. या शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेहना बेग यांनी, प्रास्ताविक अॅड. भूपेश पाटील यांनी, तर आभार सुधीर वानखेडे यांनी मानले. प्रतिभा यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे कोरेगाव च्या वैभवात भर पडली असून, त्यांचे सर्वत्र स्वागत, अभिनंदन होत आहे