शेंडगेवाडी ते बनपुरी रस्ता ४५ दिवसांत रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन: शेंडगेवाडीतील उपोषण चौथ्या दिवशी मागे
आटपाडी kd24newz:शेंडगेवाडी, ता. आटपाडी : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत शेंडगेवाडी ते बनपुरी रस्त्याचे काम काही ठराविक लोकांच्या विरोधामुळे अडथळ्याला सामोरे जात होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी समाधान आण्णा कचरे, कैलास शेंडगे,आणि सचिन बंडगर यांच्या नेतृत्वाखाली दि 23 जून पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. चार दिवस चाललेल्या या उपोषणाच्या मागण्या सकारात्मक पद्धतीने सोडवल्या गेल्यामुळे अखेर उपोषण मागे घेण्यात आले.
दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, सांगली कार्यालयाकडून समाधान कचरे व अन्य शेंडगेवाडी-बनपुरी ग्रामस्थांना लेखी आश्वासन देण्यात आले. यामध्ये अडथळ्याच्या ठिकाणी पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आल्याचे स्पष्ट केले असून, संरक्षण मिळताच काम तत्काळ सुरू करून ४५ दिवसांत खडीकरणासह प्राथमिक काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.
याप्रसंगी कार्यकारी उपअभियंता सागर पाटील यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. कनिष्ठ अभियंता विनोद कोळी, ठेकेदार किरण देशमुख यांची उपस्थिती होती. तसेच तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दादासाहेब पुकळे, निवडणूक नायब तहसीलदार प्रकाश सगर, पोलीस अधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामातील अडचणींवर खुल्या संवादातून तोडगा काढत, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या. ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्ता मुरमीकरण काम तात्काळ काम पूर्ण करण्यात आले असून, पुढील एक महिन्यात पक्का रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले. या सकारात्मक निर्णयामुळे शेंडगेवाडी येथील ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.
शेती आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता गेल्या काही महिन्यांपासून रखडला होता. मात्र, ग्रामस्थांच्या संघर्षाला यश मिळाले असून आता रस्त्याच्या कामास गती मिळणार आहे. या प्रक्रियेत शांततामय आंदोलनातून प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात विश्वासाचे नाते दृढ झाले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.