शिष्यवृत्ती योजनांचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार!
आटपाडी येथे शिक्षण अधिकारी महेश धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी कार्यशाळा
आटपाडी (kd24newz) :पंचायत समिती सभागृहात शिक्षण क्षेत्रातील विविध योजनांचा जागर या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला माननीय शिक्षणाधिकारी (योजना) श्री महेश धोत्रे साहेब यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी आटपाडी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व ‘कुटुंब प्रमुख’ म्हणून ओळखले जाणारे सन्माननीय श्री मयूर लाडे साहेब यांच्या मार्गदर्शनासह ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री जगन्नाथ बाबा कोळपे साहेब यांच्या नियंत्रणाखाली आणि श्री अशोक विनायक म्हेत्रे साहेब यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य या कार्यशाळेस उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. कार्यशाळेत शिक्षणाधिकारी योजना कार्यालय, जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने विद्यार्थी लाभाच्या विविध योजना तसेच शिष्यवृत्ती संदर्भातील ऑनलाईन पोर्टल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
विशेषतः केंद्र पुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता अभियान’ अंतर्गत मुख्याध्यापकांनी असाक्षर व्यक्तींची तात्काळ ‘उल्लास ॲप’ वर नोंदणी करून घेऊन त्यांचे वर्ग सुरू करण्याबाबत श्री धोत्रे साहेब यांनी स्पष्ट सूचना दिल्या. तसेच सारथी शिष्यवृत्ती, इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा, NSP 2.0 फ्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, दिव्यांग शिष्यवृत्ती, NMMSS इत्यादी योजना तसेच इतर अनुषंगिक शिष्यवृत्ती विषयक मार्गदर्शन जिल्हा समन्वयक (योजना) श्री बाहुबली रई यांनी प्रभावी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे केले.
समग्र शिक्षा अभियानाकडील सर्व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक समग्र शिक्षा पंचायत समिती आटपाडीचे श्री प्रशांत चंदनशिवे यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री जगन्नाथ बाबा कोळपे यांनी केले.
या प्रसंगी योजना कार्यालयातील उपशिक्षणाधिकारी श्री गंगाधर गिरी, सहाय्यक श्री ओंकार जाधव तसेच तालुक्यातील सर्वच मुख्याध्यापक, लिपिक व तंत्रस्नेही शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी लाभ कोणत्याही परिस्थितीत वंचित राहणार नाही, यासाठी मुख्याध्यापकांनी विशेष दक्षता घ्यावी, असा सज्जड इशारा श्री महेश धोत्रे साहेब यांनी दिला.
कार्यक्रमादरम्यान उल्लास नवभारत साक्षरता अभियानांतर्गत साक्षर झालेले श्री उजना लवटे यांचा सन्मान माननीय शिक्षणाधिकारी (योजना) श्री महेश धोत्रे साहेब यांच्या हस्ते बुके व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
शेवटी, “या कार्यशाळेमुळे शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ देणे अधिक सुकर व सुलभ होणार आहे,” असे प्रतिपादन श्री धोत्रे साहेब यांनी केले.