"८५ वर्षांचे असले तरी 'शेंडगेवाडीच्या स्वाभिमानासाठी' रणधुमाळीत उतरलेले शिवाजी तात्या!"
धरणे आंदोलनात दिवसभर ठाण मांडून बसले; ठामपणे दिली ग्रामस्थांना नवसंजीवनी
आटपाडी kd24newz: आटपाडी, शेंडगेवाडी नवीन ग्रामपंचायतीच्या निर्मितीसाठी गेल्या शुक्रवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना सोमवारी माजी सरपंच शिवाजी तात्या पाटील आणि त्यांचा सवंगडी आप्पासो काळेबाग सर या ज्येष्ठ स्वाभिमानी नेत्यांनी दिलेल्या थेट उपस्थितीमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. ८५ वर्षांचा जीवनप्रवास पूर्ण करूनही त्यांचा उत्साह, निर्धार, आणि डोळ्यातील तेज आजही तरुणाईला लाजवेल असा आहे.
आटपाडी ग्रामपंचायतीवर अधिराज गाजवलेले, समाजकार्याच्या मैदानात कणखर नेतृत्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे शिवाजी तात्या यांनी धरणे स्थळी उपस्थित राहून दिवसभर ठाण मांडून बसत ग्रामस्थांचे मनोबल उंचावले. या वेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते ठाम शब्दांत म्हणाले,
"शेंडगेवाडीच्या स्वाभिमानाचा हा प्रश्न आहे. हा लढा न्याय्य आहे, आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत उभा आहे."
तात्यांचा आवाज ठाम आणि विचार स्पष्ट त्यांच्या अनेक दशकांच्या सामाजिक कार्याचा अनुभव या लढ्याला बळ देणारा ठरत आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वात प्रश्न तडीस नेण्याचे विलक्षण कौशल्य आहे. याआधीही त्यांनी सामाजिक न्यायासाठी अनेक आंदोलनं, उपोषणं यशस्वीरीत्या उभारलेली आहेत. त्यांच्या नेतृत्वाने अनेक प्रश्न शासनाच्या पातळीवर नेऊन मार्गी लावले आहेत.
शेंडगेवाडी ग्रामस्थांच्या मागणीला दुजोरा देताना त्यांनी प्रशासन आणि जनतेत एक नवीन ऊर्जा निर्माण केली. त्यांच्या उपस्थितीने आंदोलनाला एक नवा ऊर्जा व स्फूर्ती मिळाली असून, "हा लढा आता मागे हटणार नाही," अशी भावना आता ग्रामस्थांत निर्माण झाली आहे.
अशा महान नेतृत्वाच्या उपस्थितीमुळे शेंडगेवाडी ग्रामस्थांचा स्वाभिमानी लढा आता निर्णायक वळणावर येतोय, हे निश्चित!