Sanvad News आटपाडी नगराध्यक्ष निवडणुकीत एबी फॉर्मचा फटका; २२ पैकी १० अर्ज बाद

आटपाडी नगराध्यक्ष निवडणुकीत एबी फॉर्मचा फटका; २२ पैकी १० अर्ज बाद

Admin

 आटपाडी नगराध्यक्ष निवडणुकीत एबी फॉर्मचा फटका; २२ पैकी १० अर्ज बाद!

नगरसेवक पदावरही बाद अर्जांची मोठी संख्या;निवडणूक आयोगाचा निर्णयावर उमेदवारांचा संताप उसळला!

आटपाडी kd24newz: ता. १९ – आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष निवडणुकीत एबी फॉर्म वादाचा मोठा भूचक्‍का बसला असून दाखल झालेल्या २२ अर्जांपैकी तब्बल १० अर्ज अवैध ठरविण्यात आले. पक्षाकडून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत अनिवार्य एबी फॉर्म नसल्याने नगराध्यक्ष तसेच नगरसेवक उमेदवारांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद केले गेले. या कार्यवाहीवर उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला.

आटपाडी नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया वेगात सुरु आहे. नगराध्यक्ष पदासाठी २२ तर नगरसेवक पदासाठी तब्बल १९७ अर्ज दाखल झाले होते. आज झालेल्या छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदाच्या २२ पैकी १२ अर्ज वैध तर १० अर्ज अवैध ठरले. पक्षाकडून उमेदवारी दाखल करणाऱ्या अनेक उमेदवारांच्या अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म संलग्न नसल्यामुळे हे अर्ज थेट बाद करण्यात आल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले. उमेदवारांनी या निर्णयावर आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी शासनाने आजच जारी केलेल्या अध्यादेशाची प्रत दाखवत आपली भूमिका स्पष्ट केली.

नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे यु.टी. जाधव, शिवसेनेचे रावसाहेब सागर, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सौरभ पाटील, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सादिक खाटीक यांचे अर्ज वैध ठरले. तर अपक्ष म्हणून हरीश खिलारी, गुरुप्रसाद कवडे, चंद्रकांत हाके, संदीप फुले, दगडू काळे, अशोक लवटे, लक्ष्मण नवले आणि अरुण बलटे यांच्या अर्जांनाही वैधता मिळाली.

दरम्यान, शिवसेनेने दुसऱ्या क्रमांकाची पसंती दिलेल्या पांढरीनाथ नागणे आणि डॉ. सप्तेश जाधव यांच्या अर्जांनाही सुचक नसल्याचे कारण देत अवैध ठरविण्यात आले. नगरसेवक पदासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशा प्रत्येकी तीन-तीन अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी प्रत्येकी दोन अर्ज बाद झाल्याचे समोर आले आहे. नगरसेवक पदावर बाद अर्जांची संख्या लक्षणीय असून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

अर्ज छाननीनंतर नगराध्यक्ष पदावर चौरंगी लढतीची शक्यता स्पष्ट झाली असली तरी अंतिम चित्र अर्ज माघारीनंतरच उलगडणार आहे. निवडणूक प्रक्रियेत एबी फॉर्मच्या अटीमुळे झालेला मोठा उलथापालथ हा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यातील सर्वात मोठा धक्का ठरला आहे.



To Top