Sanvad News राजेवाडी तलाव सांगलीकडे वर्ग करण्याचा मंत्र्यांचा पुन्हा आदेश

राजेवाडी तलाव सांगलीकडे वर्ग करण्याचा मंत्र्यांचा पुन्हा आदेश

Admin

 राजेवाडी तलाव सांगलीकडे वर्ग करण्याचा मंत्र्यांचा पुन्हा आदेश

==आमदार सुहास बाबर यांच्या प्रयत्नांना यश==


आटपाडी kd24newz ;दि. ५ राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याचा आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुन्हा दिला आहे.

   आमदार सुहास बाबर यांनी मुंबई मंत्रालय येथे दि. ४ नोव्हेंबर रोजी मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांची तातडीने भेट घेऊन राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याचा विषय मांडला.

   दि. ११ जून रोजी सांगली येथे झालेल्या आढावा बैठकीत मंत्री महोदयांनी संबंधित आदेश दिला होता. तथापि चार महिने उलटून गेले तरी हा आदेश अंमलात आणला गेला नाही, उलट राजेवाडी तलाव सातारा सिंचन मंडळाकडे वर्ग करण्याचा आदेश महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांचे कार्यकारी संचालक श्री. हणमंत गुणाले यांनी साताऱ्यातील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचे निदर्शनास आणले.

    या अन्यायी भूमिकेची दखल घेत आमदार सुहास बाबर यांनी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना राजेवाडी तलावाच्या संदर्भातील वस्तुस्थिती सविस्तरपणे समजावून सांगितली. त्यांनी स्वतःच पूर्वी सांगली जिल्ह्याकडे तलाव वर्ग करण्याचा आदेश दिला होता, आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्या आदेशाकडे दुर्लक्ष केले असल्याची गंभीर बाबही आमदार बाबर यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली.या अन्यायी भूमिकेच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनीही आवाज उठवला होता.

   या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांचे कार्यकारी संचालक श्री. हणमंतराव गुणाले यांना तातडीने फोनद्वारे निर्देश दिले.

राजेवाडी तलाव सातारा सिंचन मंडळाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया त्वरित थांबवण्याचा आणि राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचा आदेश मंत्री महोदयांनी दिला.

To Top