Sanvad News आटपाडीत पहिलीच नगरपंचायत निवडणूक ‘तणावग्रस्त’मतदानाचा उत्साह शिगेला; ७९.६२ टक्के मतदानाची नोंद

आटपाडीत पहिलीच नगरपंचायत निवडणूक ‘तणावग्रस्त’मतदानाचा उत्साह शिगेला; ७९.६२ टक्के मतदानाची नोंद

Admin

आटपाडीत पहिलीच नगरपंचायत निवडणूक ‘तणावग्रस्त’मतदानाचा उत्साह शिगेला; ७९.६२ टक्के मतदानाची नोंद!

“आटपाडीत प्रभाग 7 मध्ये मतदानासाठी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर लांबलचक रांगा”

आटपाडी kd24newz: आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत आज संध्याकाळपर्यंत तब्बल ७९.६२ टक्के मतदान होत उत्स्फूर्त प्रतिसादाची नोंद झाली. पहिल्या दोन प्रचार टप्प्यांत वातावरण शांत असले तरी मतदानाच्या पूर्वसंध्येला आणि मतदानादिवशी काही प्रभागांमध्ये झालेल्या बाचाबाची, वादावादी आणि उमेदवारांना धमकावण्याच्या प्रकारांमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया तणावग्रस्त बनली.

प्रभाग 16 मध्ये “७५ वर्षांच्या आजींनी शारीरिक अडचणींवर मात करत बजावला मतदानाचा हक्क;

    नगरपंचायत स्थापनेनंतरच्या या पहिल्या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि तीर्थक्षेत्र संयुक्त विकास आघाडी यांच्यात तिरंगी लढत झाली. शिवसेनेतर्फे रावसाहेब सागर, भाजपातर्फे यू.टी. जाधव तर संयुक्त आघाडीकडून सौरभ पाटील हे उमेदवार रिंगणात उतरले होते. भाजपाचा प्रचार आमदार गोपीचंद पडळकर, अमरसिंह देशमुख, मंत्री चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे, पंकजा मुंडे, सुरेश खाडे यांच्या उपस्थितीने रंगात आला. शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनी मंत्र्यांना न बोलावता स्वतःच प्रत्येक प्रभागात सभा घेत प्रचार मोहीम राबवली. तर संयुक्त आघाडीचा प्रचार माजी आमदार राजेंद्र देशमुख, भारत पाटील, डी.एम. पाटील, आनंदराव पाटील यांनी सांभाळला.

“प्रभाग 6 मध्ये मतदानासाठी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर लांबलचक रांगा”

    प्रचारकाळात तिन्ही गटांनी तुलनेने संयम राखला असला तरी मतदानाचा दिवस जवळ येताच वातावरण तंग झाले. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, शब्दांत वादावादीचे प्रकार घडत राहिले. काही उमेदवारांना धमकावल्याच्या तक्रारीही समोर आल्याने पोलिसांना सतर्क राहावे लागले. मतदानादिवशीही काही प्रभागांत तणावपूर्ण शांतता जाणवत होती.

    सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत केवळ १० टक्के मतदान झाले होते. दुपारी ३.३० वाजेपर्यंत १३,३५९ मतदारांनी मतदान करीत ६४.७७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. संध्याकाळी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर २०,६११ पैकी १६,४१० मतदारांनी मतदान करून एकूण ७९.६२ टक्के मतदानाची नोंद झाली.

    प्रभाग क्रमांक ४ मध्ये सकाळी मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्याने थोड्या वेळासाठी मतदान स्थगित ठेवावे लागले. तर प्रभाग क्रमांक २ मधील मतदान केंद्र ‘पिंक बूथ’ म्हणून आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते. पिंक रंगाची स्वागत कमान, सेल्फी पॉईंट आणि विशेष सजावट यामुळे मतदारांचे लक्ष या बूथकडे वेधले गेले. मतदान करून मतदारांनी सेल्फी टिपत मतदानाचा उत्साह व्यक्त केला.

    सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसत होत्या. कार्यकर्त्यांची मतदारांना बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू होती. काही ठिकाणी सतत झालेल्या बाचाबाचीमुळे वातावरण तापले होते. शांततेत सुरू झालेली निवडणूक शेवटच्या तासांत तणावग्रस्त व धगधगती बनल्याचे चित्र पाहायला मिळाले.

To Top