जिल्हा बँकेच्या झरे (ता. आटपाडी) शाखेत मोठी चोरी; 22 लॉकर फोडून मौल्यवान ऐवज लंपास
आटपाडी kd24new z: दि. ८ जानेवारी २०२६ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे (ता. आटपाडी) येथील शाखेत मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी घुसखोरी करून स्ट्रॉंग रूममधील तब्बल 22 लॉकर फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या लॉकरमध्ये ठेवलेला मोलाचा ऐवज चोरीस गेल्याचा प्राथमिक अंदाज असून, नेमके नुकसान किती झाले आहे याबाबत पोलिस तपास व लॉकरधारकांच्या तक्रारीनंतरच अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे.
झरे येथील स्टँड परिसरातील इमारतीत भाडेतत्त्वावर ही बँक शाखा कार्यरत आहे. प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी पूर्वेकडील बाजूस असलेल्या खिडकीचे गज कापून बँकेत प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने स्ट्रॉंग रूममधील लॉकर तोडण्यात आले. चोरीदरम्यान हातमोजे वापरण्यात आले असल्याचे तसेच सीसीटीव्ही बंद करून डीव्हीआर ताब्यात घेतल्याचे समजते.
सकाळी बँकेचे कर्मचारी शाखेत आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच शाखेत लॉकरधारक ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तुटलेल्या लॉकरच्या संबंधित मालकांना बोलावून चोरीस गेलेल्या ऐवजाचा तपशील नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आटपाडी पोलिसांनी तात्काळ हालचाली करत ठसेतज्ज्ञ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासासाठी पाचारण केले आहे.
या ठिकाणी एक वर्षापूर्वी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता, ही बाबही तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, घटनास्थळी आमदार गोपीचंद पडळकर, बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, पोलीस उपअधीक्षक कल्पना बारवकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास व गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लॉकरमधील ऐवज चोरीस गेल्याने नुकसानीची निश्चित रक्कम व बँकेच्या भरपाई धोरणाबाबत अद्याप स्पष्टता नसल्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही प्राथमिक अंदाज व्यक्त होत असले तरी, सोने-चांदी व रोख रकमेबाबतची नेमकी माहिती पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिकृतपणे स्पष्ट होईल,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

