Sanvad News शिक्षकांच्या संघर्षाला मिळाले यश; शिक्षक बँकेत सत्ता परिवर्तन

शिक्षकांच्या संघर्षाला मिळाले यश; शिक्षक बँकेत सत्ता परिवर्तन

Admin

 शिक्षकांच्या संघर्षाला मिळाले यश; शिक्षक बँकेत सत्ता परिवर्तन 

संघर्ष योद्ध्यांचा उद्या भव्य सत्कार; आटपाडीतील शिक्षक संघटनांचे एकत्रित शक्तीप्रदर्शन

आटपाडी kd24newz :आटपाडी तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनींनी गेल्या तीन ते साडेतीन वर्षांत शिक्षक बँकेतील सभासदविरोधी, अपारदर्शक व नियमबाह्य कारभाराविरोधात उभारलेला संघर्ष अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, या संघर्षाला यश प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक लढ्यात ठाम भूमिका घेणाऱ्या संघर्ष योद्ध्यांचा भव्य सत्कार समारंभ रविवारी, दि. 11 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक शाखा, आटपाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

      या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे संयुक्त आवाहन आटपाडी तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष यशवंत गोडसे, आटपाडी तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष संजय कबीर, आटपाडी तालुका जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष नितीन गळवे व आटपाडी तालुका शिक्षक भारतीचे अध्यक्ष बिरू मुढे यांच्यासह संबंधित सर्व पदाधिकारी, सभासद व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

     गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक बँकेतील कारभाराबाबत सातत्याने आवाज उठवत शिक्षक बँकेचे संचालक सचिन खरमाटे सर व कृष्णा पोळ सर, तसेच पूर्वाश्रमीचे शिक्षक बँकेचे डबल चेअरमन शिक्षक नेते यु.टी. जाधव सर, पूर्वाश्रमीचे शिक्षक बँकेचे चेअरमन व शिक्षक नेते, शिक्षण विस्तार अधिकारी जगन्नाथ कोळपे सर, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन पोपटराव सूर्यवंशी, शिक्षक नेते विश्वास पुजारी सर यांनी सभासदहिताची ठाम भूमिका घेतली.

      शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती होऊ नये, मासिक सभेचे प्रोसीडिंग सभासदांना मिळावे, तसेच बँकेच्या कारभारावर नियंत्रण व पारदर्शकता राहावी, यासाठी या सर्वांनी सहकार विभाग, मंत्रालय, सहकार मंत्री, निबंधक कार्यालय येथे सातत्याने तक्रारी दाखल करून पाठपुरावा केला. वर्तमानपत्रांमधून वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून सभासदांना जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही करण्यात आले. मात्र, तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी पायउतार होईपर्यंत सभासदांना प्रोसीडिंग देण्यास टाळाटाळ केली.

      नोकरभरतीच्या हव्यासापोटी महिला चेअरमन व इतर संचालकांना विश्वासात न घेता भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न झाला. महिला चेअरमन यांना डावलून सहीचे अधिकार व भरतीचे अधिकार स्वतःकडे घेण्याचा संतापजनक प्रकार घडल्याने काही संचालकांनी महिला चेअरमनवर होणाऱ्या अन्यायाविरोधात व शिक्षक बँकेतील नोकरभरतीविरोधात ठाम आवाज उठविला. याच संघर्षाचा परिपाक म्हणजे शिक्षक बँकेत सत्ता परिवर्तन घडून आले.

      या सत्ता परिवर्तनामुळे कृष्णा पोळ सर व सचिन खरमाटे सर यांना सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली. आटपाडी तालुक्याचे संचालक सचिन खरमाटे सर यांना आटपाडी व विटा शाखेचे शाखा संचालक पद देऊन बँकेच्या कारभाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून उद्या भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

     या कार्यक्रमास शिक्षक बँकेच्या चेअरमन सौ. रुपाली अविनाश गुरव मॅडम, संचालक अमोल माने सर, संचालक अमोल शिंदे सर व संचालक राहुल पाटणे सर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. हा सत्कार समारंभ म्हणजे शिक्षकांच्या हक्कासाठी लढलेल्या संघर्षाचा गौरव असून, शिक्षक संघटनांच्या एकजुटीचे प्रतीक ठरणार आहे.

       या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुका शिक्षक समिती, आटपाडी तालुका शिक्षक संघ, आटपाडी तालुका जुनी पेन्शन संघटना व आटपाडी तालुका शिक्षक भारती संघटना यांच्या अध्यक्ष, पदाधिकारी, सभासद व कार्यकर्त्यांच्या वतीने तालुक्यातील सर्व शिक्षकांना या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे.

To Top