आचारसंहिता संपताच शेटफळेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार ; विनायक मासाळ
स्वखर्चाने पुतळा बसवण्याची जाहीर घोषणा; शब्दाला जागणारे नेतृत्व; शेटफळेत महायुतीची भव्य पदयात्रा व नेत्यांची आक्रमक भूमिका
आटपाडी प्रतिनिधी ;जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत शेटफळे गावात राष्ट्रवादी काँग्रेस–शिवसेना महायुतीच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असून, आचारसंहिता संपल्यानंतर २० ते २५ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्वखर्चाने बसवणार, अशी ठाम व जाहीर घोषणा करगणी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार मा. विनायकराव मासाळ साहेब यांनी केली. त्यांच्या या घोषणेमुळे शेटफळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज शेटफळे येथे शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीचे करगणी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार मा. विनायकराव मासाळ साहेब व करगणी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार मा. दत्तात्रय पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेद्वारे गावातील प्रमुख मार्गांवरून प्रचार करण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून थेट विरोधकांवर निशाणा साधत सांगितले,“आज निवडणुकीत शब्दांची नव्हे तर विश्वासाची गरज आहे. विनायक मासाळ हे बोलघेवडे नेते नाहीत, तर करून दाखवणारे नेतृत्व आहे. आटपाडी तालुक्यात आणि करगणी गटात विकास कसा करायचा, हे त्यांनी प्रत्यक्ष कामातून दाखवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची घोषणा ही केवळ निवडणूक घोषणा नसून, ती त्यांच्या विचारांची आणि श्रद्धेची खूण आहे. ज्यांनी कधी गावासाठी काहीच केलं नाही, ते आज आश्वासनांची खैरात वाटत आहेत, पण जनतेला आता खरी-खोटी ओळखण्याची अक्कल आहे.”
या प्रसंगी आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन (दिपसरकार) देशमुख, दत्तात्रय (पंच) पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, प्रदीप देशमुख यांच्यासह शेटफळे गावातील नागरिक, ग्रामस्थ, महिला, तरुण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचार सभेत बोलताना विनायक मासाळ म्हणाले, “महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शेटफळेसारख्या सुसंस्कृत गावात उभारण्याची संधी मला मिळणार आहे, हे मी माझे भाग्य समजतो. मी जनतेला शब्द देत आहे की आचारसंहिता संपल्यानंतर २० ते २५ दिवसांत हा पुतळा स्वखर्चाने बसवला जाईल.”विरोधकांना उद्देशून ते पुढे म्हणाले, “मी शब्द दिला आहे आणि तो मी नक्की पाळणार. त्यामुळे कुणीही घाईघाईने दुसरे शब्द देऊन जनतेची दिशाभूल करू नये. जर मी दिलेल्या कालावधीत पुतळा बसवला नाही, तर तुम्ही खुशाल तो बसवा,” असे ठाम आणि आव्हानात्मक वक्तव्य त्यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा केवळ स्मारक नसून, तो प्रेरणा, स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि सुशासनाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. गावाच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळखीला बळ देणारे काम महायुतीच्या माध्यमातून प्राधान्याने केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पंचायत समिती उमेदवार दत्तात्रय पाटील यांनीही मतदारांशी संवाद साधत, शेटफळे व परिसरातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, रोजगार आणि युवकांसाठी विकासात्मक उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील समन्वयातून गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
शेटफळे गावातील नागरिकांनी महायुतीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत, शब्दाला जागणारे आणि ठोस निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून विनायक मासाळ यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
एकूणच शेटफळे गावात राष्ट्रवादी–शिवसेना महायुतीच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले असून, विकास, स्वाभिमान आणि शब्दाला जागणारे नेतृत्व या मुद्द्यांवर विनायक मासाळ यांची भूमिका अधिक ठळक होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

