आटपाडी नगरपंचायतीच्या विकासाची सूत्रे,ऋषिकेश देशमुख यांच्या हाती
नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड
आटपाडी : kd24newz;आटपाडी नगरपंचायत कार्यालयात पिठासन अधिकारी वैभव हजारे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या बिनविरोध निवडी शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या. या निवड प्रक्रियेत नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी ऋषिकेश देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, आटपाडी शहराच्या सर्वांगीण व दीर्घकालीन विकासाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.
ऋषिकेश देशमुख हे अभ्यासू, दूरदृष्टी असलेले आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून शहराचा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करणे, शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ शहरापर्यंत पोहोचविणे, निधीचे योग्य नियोजन व प्रभावी अंमलबजावणी, तसेच चालू व प्रस्तावित विकासकामांवर काटेकोर देखरेख ठेवणे ही महत्त्वाची कामे त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहेत.
नगरपंचायत हद्दीतील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, नागरी सुविधा तसेच मूलभूत पायाभूत सुविधा यांचा समन्वय साधत संतुलित विकास घडविणे, हे या समितीचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.
अल्पकालीन गरजांसोबतच भविष्यातील वाढती लोकसंख्या, नागरी गरजा व विकासाच्या संधी लक्षात घेऊन शाश्वत विकासाचे धोरण राबविण्यावर ऋषिकेश देशमुख यांनी भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
विशेषतः शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी पाठपुरावा, विकास निधीचा पारदर्शक वापर, तसेच कामांची वेळेत पूर्तता व गुणवत्ता नियंत्रण याबाबत कठोर भूमिका घेतली जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवून नागरिकाभिमुख विकास साधणे हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य राहणार आहे.
निवडीनंतर पिठासन अधिकारी वैभव हजारे तसेच नगराध्यक्ष मा.उत्तम जाधव (यु. टी.सर) यांनी ऋषिकेश देशमुख यांचे अभिनंदन करत, “नियोजनबद्ध व दूरदृष्टीपूर्ण निर्णयांच्या माध्यमातून आटपाडी शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल” असा विश्वास व्यक्त केला.
याच बैठकीत नगरपंचायतीच्या इतर विषय समित्यांच्याही निवडी पार पडल्या असल्या तरी शहर विकासाचा पाया घडविणाऱ्या नियोजन व विकास समितीकडे विशेष लक्ष लागून आहे. ऋषिकेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी नगरपंचायत विकास, पारदर्शकता व लोकहिताचा आदर्श निर्माण करेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
