Sanvad News सौ.संध्या अनिल पाटील यांची आटपाडी नगरपंचायतीच्या स्वच्छता व वैद्यकीय समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड

सौ.संध्या अनिल पाटील यांची आटपाडी नगरपंचायतीच्या स्वच्छता व वैद्यकीय समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड

Admin

 सौ.संध्या अनिल पाटील यांची आटपाडी नगरपंचायतीच्या स्वच्छता व वैद्यकीय समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड

आरोग्य, स्वच्छता व लोकहिताच्या कामांना नवी दिशा


आटपाडी प्रतिनिधी ; आटपाडी नगरपंचायत कार्यालयात पिठासन अधिकारी वैभव हजारे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या बिनविरोध निवडी शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या. या निवड प्रक्रियेत स्वच्छता व वैद्यकीय समितीच्या सभापतीपदी संध्या अनिल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, शहराच्या आरोग्य व स्वच्छतेशी निगडित अत्यंत महत्त्वाच्या विभागाचे नेतृत्व त्यांच्या हाती आले आहे.

    सौ.संध्या अनिल पाटील या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या, कार्यतत्पर आणि लोकाभिमुख नेत्या म्हणून ओळखल्या जातात. स्वच्छता व वैद्यकीय समितीच्या माध्यमातून शहर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य सेवा, साथीचे आजार प्रतिबंध, आरोग्य तपासणी शिबिरे, माता-बाल आरोग्य आणि स्वच्छ पर्यावरण निर्मिती या सर्व बाबींवर त्यांनी ठोस व परिणामकारक काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

    नगरपंचायत हद्दीतील कचरा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करणे, आरोग्य विभागाच्या सेवा सक्षम करणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे, हे या समितीचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे. स्वच्छता आणि आरोग्य या विषयांमध्ये सातत्य, काटेकोर अंमलबजावणी व प्रशासनाशी समन्वय साधत लोकांच्या दैनंदिन जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्याचा संकल्प संध्या पाटील यांनी केला आहे.

    विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संध्या अनिल पाटील यांच्या या यशामागे त्यांचे पती अनिलशेठ पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. सामाजिक कार्याची जाण, सातत्याने दिलेले मार्गदर्शन, खंबीर पाठिंबा आणि प्रत्येक टप्प्यावर दिलेले प्रोत्साहन यामुळेच संध्या पाटील यांचा हा प्रवास अधिक सक्षमपणे घडत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. पती-पत्नीचा हा सामाजिक सहभाग आटपाडीच्या सार्वजनिक जीवनात सकारात्मक आदर्श निर्माण करणारा ठरत आहे.

   निवडीनंतर पिठासन अधिकारी वैभव हजारे तसेच नगराध्यक्ष मा. उत्तम जाधव यांनी संध्या अनिल पाटील यांचे अभिनंदन करत, “स्वच्छता व आरोग्य क्षेत्रात ठोस निर्णय घेत आटपाडी शहराला स्वच्छ, निरोगी व सुसंस्कृत बनविण्यात मोलाची भूमिका बजवाल” असा विश्वास व्यक्त केला.

     नगरपंचायतीच्या इतर विषय समित्यांच्याही निवडी याच बैठकीत पार पडल्या असल्या तरी स्वच्छता व वैद्यकीय समितीकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागून आहे. संध्या अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी शहरात स्वच्छता, आरोग्य आणि लोकहिताचा नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

To Top