शिवसेनेच्या प्रचार गाडीमुळे भाजप सभेत गोंधळ; विभूतवाडीतील राड्याप्रकरणी भाजपचा गंभीर आरोप; निवडणूक प्रचारात तणावाचे वातावरण
आटपाडी :विभूतवाडी येथे सुरू असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचार सभेत मुद्दाम अडथळा आणल्याचा गंभीर आरोप भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांवर केला आहे. शिवसेना उमेदवार डॉ. विद्याताई मोटे यांच्या समर्थकांनी मोठ्या आवाजात स्पीकर लावलेली प्रचार गाडी थेट सभास्थळी उभी करून भाजपच्या प्रचारात व्यत्यय आणल्याचा दावा भाजप कार्यकर्ते मोहन खरजे यांनी केला आहे.
भाजप उमेदवार माधवीकाकी पडळकर यांच्या कोपरा सभेदरम्यान हा प्रकार घडल्याने गावात अचानक राजकीय तणाव निर्माण झाला. प्रचारासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून जाणीवपूर्वक अडथळे आणण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत असून, निवडणूक आचारसंहितेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मोहन खरजे यांनी सांगितले की, विभूतवाडी येथे भाजपचा प्रचार शुभारंभ होणार असल्याची माहिती विरोधकांना आधीच होती. असे असतानाही मुद्दाम सभास्थळी जाणाऱ्या मार्गावर प्रचार गाड्या आडव्या लावून अडथळे निर्माण करण्यात आले. कोणताही वाद होऊ नये म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी पालखी रस्त्याने शांततेत सभा सुरू केली. मात्र सभा सुरू असतानाच स्पीकर सुरू असलेली प्रचार गाडी थेट सभास्थळी उभी करण्यात आल्याने परिस्थिती चिघळली.
या प्रकाराला विरोध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले असता, आमच्यावरच हल्ला करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या गोंधळादरम्यान संबंधित प्रचार गाडीच्या काचा फुटल्याची घटना घडली; मात्र त्या काचा नेमक्या कोणी फोडल्या, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
आम्ही कोणाच्याही गाडीवर हल्ला केलेला नाही. उलट आमच्यावरच हल्ला झाला असून आमच्यावर केलेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत, असे स्पष्ट मत भाजप आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांचे कार्यकर्ते मोहन खरजे यांनी व्यक्त केले.
या घटनेमुळे निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर विभूतवाडी परिसरात वातावरण तापले असून, अशा प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच प्रचारादरम्यान शांतता राखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.
