करगणीतील नंदीवाले समाजाचा भाजपला जाहीर पाठिंबा ; दादासाहेब हुबाले व संभाजी पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार
‘आपल्यासाठी जो लढतो, तोच आपला’ या भूमिकेतून बालाजी नगरमधील नंदीवाले समाजाचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
आटपाडी : करगणी येथील बालाजी नगरमधील नंदीवाले समाजातील सर्व बांधवांनी भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा देत आगामी निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार दादासाहेब हुबाले व संभाजी पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या जाहीर पाठिंब्यामुळे करगणी परिसरातील राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली असून भाजपच्या बळात लक्षणीय भर पडली आहे.
नंदीवाले समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नांना विधानसभेत सातत्याने व ठामपणे मांडून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे भाजप नेते मा. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे समाजबांधवांनी स्पष्ट केले. ‘आपल्यासाठी जो लढतो, तोच आपला’ या स्पष्ट भूमिकेतून नंदीवाले समाजाने भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत विकासनिष्ठ व समाजाभिमुख राजकारणाला बळ दिले आहे.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बोलताना सांगितले की, भारतीय जनता पार्टीने नेहमीच वंचित, उपेक्षित व दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले असून नंदीवाले समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी भाजपचे नेतृत्व ठामपणे उभे राहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांना अधिक प्रभावी व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी बाळू चव्हाण, आण्णा जाधव, बाळू जाधव, बबलू पवार, आकाश जाधव, बबन जाधव, गोमा जाधव, तुकाराम जाधव, बोला पवार, रावसाहेब चव्हाण, पप्पू जाधव, साहिल चव्हाण, रामा जाधव, गणेश जाधव, भाऊ जाधव, दीपक जाधव, सोन्या जाधव, बापू जाधव, बंडू पवार, भोला पवार, किसन पवार, अंकुश पवार यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंदीवाले समाजाचा भाजपच्या विकासनिष्ठ, लढवय्या व समाजाभिमुख नेतृत्वावर व्यक्त झालेला हा ठाम विश्वास आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या निर्णयामुळे करगणी व आटपाडी तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.
