करगणी येथे महाशिवरात्रीनिमित्त खिलार जनावरांची भव्य यात्रा;१६ ते २३ फेब्रुवारीदरम्यान आयोजन; आजारग्रस्त जनावरांना सक्त प्रवेशबंदी
आटपाडी kd24newz : आटपाडी तालुक्यातील करगणी येथे श्री लखमेश्वर देवाच्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त दरवर्षी भरणारी पारंपरिक खिलार जनावरांची यात्रा यावर्षी सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भरणार असून, या यात्रेचे आयोजन कृषि उत्पन्न बाजार समिती, आटपाडी व ग्रामपंचायत करगणी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
ही यात्रा आटपाडी–भिवघाट तसेच करगणी–बाळेवाडी रस्त्यालगतच्या मोकळ्या पटांगणात, याशिवाय पाणीपुरवठा पाण्याची टाकी व वीज मंडळ परिसरात भरविण्यात येणार आहे. यात्रेच्या कालावधीत सांगली जिल्ह्यासह परिसरातील विविध तालुक्यांमधून मोठ्या संख्येने शेतकरी, पशुपालक, व्यापारी व दलाल उपस्थित राहण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने प्रशासनाने आवश्यक ते नियोजन केले आहे.
सध्या जनावरांमध्ये आढळणाऱ्या लम्पी स्किन डिसीज तसेच लाळ-खुरकत या संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. लम्पीग्रस्त अथवा लाळ-खुरकत लागण झालेली जनावरे यात्रेमध्ये खरेदी-विक्रीसाठी आणू नयेत, असे स्पष्ट आदेश देण्यात आले असून, अशा जनावरांना यात्रेच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असेही प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
यात्रा शांततेत, सुरक्षिततेत व सुव्यवस्थितरीत्या पार पडावी, यासाठी सर्व शेतकरी, व्यापारी व दलालांनी नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जनावरांच्या पाण्याच्या सोयीसाठी बॅरल किंवा सेन्टेक्स टाकी शेतकऱ्यांनी स्वतःबरोबर आणाव्यात, असे आवाहन बाजार समितीचे सभापती मा. पै. संतोष (भाऊ) पुजारी यांनी केले आहे.
खिलार जनावरांची ही पारंपरिक यात्रा केवळ खरेदी-विक्रीपुरती मर्यादित नसून, पशुपालकांसाठी दर्जेदार जनावरांची देवाणघेवाण, माहितीची देवाणघेवाण व परंपरेचे जतन करणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी जबाबदारीने सहभाग घ्यावा, असेही आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
