हायव्होल्टेज आटपाडीत शिंदे गटाचा झेंडा, जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना थेट संघर्ष!
जिल्हा परिषद–पंचायत समिती निकालांनी तालुक्याचे राजकीय समीकरण बदलले; विद्याताई मोटे यांच्या लढतीचे सर्वत्र कौतुक!
आटपाडी प्रतिनिधी ;आटपाडी तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांनी तालुक्याचे राजकीय चित्र पूर्णतः बदलून टाकले आहे. शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाच्या गटांमध्ये दणदणीत यश मिळवत सत्तापालट घडवून आणला असून, काही ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व कायम राखत थेट संघर्षाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या निकालांमुळे आगामी काळातील तालुक्यातील राजकारण अधिक गतिमान होणार असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या खरसुंडी व दिघंची या दोन महत्त्वाच्या गटांवर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करत करगणी गटातही यश संपादन केले. दरम्यान, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठेच्या निंबवडे गटात भाजपने विजय मिळवत आपला दबदबा कायम ठेवला.
पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने उल्लेखनीय कामगिरी करत आठपैकी पाच जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. खरसुंडी, नेलकरंजी, दिघंची, विठ्ठलापूर व करगणी या गणांत शिवसेनेने बाजी मारत सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली.
खरसुंडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदीप भोसले यांनी भाजपचे चंद्रकांत भोसले यांचा तब्बल २,७५० मतांनी पराभव करत मागील पराभवाची जोरदार परतफेड केली.
खरसुंडी पंचायत समिती गणात भाजपच्या डॉ. मीनाक्षी पुजारी यांनी शिवसेनेच्या लता पुजारी यांचा पराभव केला, तर नेलकरंजी गणात शिवसेनेच्या सुनीता सरगर यांनी भाजपच्या पौर्णिमा म्हारगुडे यांना पराभूत केले.
करगणी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे विनायक मासाळ यांनी शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपचे दादासाहेब हुबाले यांचा अवघ्या ६८० मतांनी पराभव करत चुरशीची लढत जिंकली.
करगणी पंचायत समिती गणात शिवसेनेचे दत्तात्रय पाटील यांनी भाजपचे संभाजीराव पाटील यांचा २,८९५ मतांनी दारुण पराभव केला.
मात्र माडगुळे गणात भाजपचे दादासाहेब मोटे यांनी शिवसेनेचे रामदास सूर्यवंशी यांचा अवघ्या ११२ मतांनी पराभव करत भाजपचा किल्ला राखला.
दिघंची जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील यांनी पहिल्याच निवडणुकीत भाजपचे कल्लाप्पा कुटे यांचा तब्बल ४,२२६ मतांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवला.
दिघंची पंचायत समिती गणात शिवसेनेच्या कल्पना पुसावळे व दिलीप हेगडे यांनी भाजपच्या वंदना शिंदे व वैभव हेगडे यांचा पराभव करत गटात क्लीन स्वीप केला.
पराभवातही पराक्रम! निंबवडेत विद्याताई मोटे यांच्या झुंजार लढतीचे कौतुक...
पडळकर विरुद्ध मोटे अशी प्रतिष्ठेची लढत ठरलेल्या निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या माधवी पडळकर यांनी शिवसेनेच्या अॅड. विद्याताई मोटे यांचा १,०१९ मतांनी पराभव केला. माधवी पडळकर या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी असून, या विजयामुळे पडळकर गटाचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे.
पराभव पत्करला असला तरी विद्याताई मोटे यांनी दिलेली झुंजार, मुद्देसूद व धैर्यपूर्ण लढत सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. अत्यंत कमी फरकाने झालेल्या पराभवानंतरही त्यांनी संयम राखत मतदारांचे मनापासून आभार मानले. “मला मिळालेले मत हे पराभव नसून मतदारांनी दिलेला आशीर्वाद आहे,” अशी भावना व्यक्त करत त्यांनी पुढील वाटचालीसाठी नवा आत्मविश्वास दाखवला. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेचे व नेतृत्वगुणांचे तालुक्यातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे, कमी फरकाने झालेल्या पराभवानंतरही त्यांनी कुठलाही आरोप-प्रत्यारोप न करता शांत व सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळेच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमधून, सामाजिक क्षेत्रातून तसेच महिला वर्गातून त्यांच्या लढतीचे खुलेपणाने कौतुक होत आहे.
आजच्या निकालात विजय कोणाचा झाला हे जरी स्पष्ट असले, तरी निंबवडे गटात विद्याताई मोटे यांनी निर्माण केलेली विश्वासाची पायाभरणी आणि नेतृत्वाची छाप ही आगामी काळात अधिक ठळकपणे दिसून येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
घरनिंकी गणात भाजपच्या वैशाली कातुरे यांनी शिवसेनेच्या अहिल्या पुकळे यांचा, तर निंबवडे गणात भाजपचे जयवंत सरगर यांनी शिवसेनेचे सचिन मोटे यांचा पराभव करत भाजपचा गड भक्कम केला.
आटपाडी तालुक्यातील या निकालांमुळे शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यातील थेट राजकीय संघर्ष अधिक ठळक झाला आहे. काही गटांत सत्तापालट घडून आला असला तरी काही ठिकाणी जुने वर्चस्व कायम राहिले आहे. या निकालांचा आगामी काळातील तालुक्यातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होणार असून, स्थानिक राजकारण अधिक चुरशीचे होण्याचे संकेत स्पष्टपणे दिसून येत आहेत.
