सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा नवा नेतृत्व अध्याय!
पहिल्यांदाच विनायकराव मासाळ यांना उपनेतेपदाची संधी; जिल्हा परिषदेत निर्णायक भूमिका निश्चित!
आटपाडी kd24newz :सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतृत्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, गटनेतेपदी सौ. राजेश्वरी रणधीर नाईक, उपनेतेपदी विनायकराव मासाळ आणि पक्षप्रतोदपदी सौ. स्नेहल मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, पहिल्यांदाच विनायकराव मासाळ यांचे नाव अग्रक्रमाने मांडत त्यांना उपनेतेपदाची संधी देण्यात आली, ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक राजकारणातील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
या निवडीमुळे जिल्हा परिषदेत विनायकराव मासाळ यांची वर्णी लागणे आता जवळपास निश्चित असल्याचे मत कार्यकर्त्यांसह वरिष्ठ नेत्यांमधून व्यक्त केले जात आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद, प्रशासकीय कामकाजातील अभ्यासू भूमिका आणि संघटन मजबूत करण्याचा अनुभव यामुळे मासाळ यांच्याकडे भविष्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.
या निवडीप्रसंगी शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, संजय काका पाटील, निशिकांत दादा भोसले-पाटील, राजेंद्र आण्णा देशमुख, तमन्नगौडा रवी पाटील, रणधीर नाईक, अनिलशेठ पाटील हर्षवर्धन देशमुख यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पदाधिकारी आणि पक्षाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या गटनेतृत्वामुळे जिल्हा परिषदेत विकासाभिमुख, समन्वयपूर्ण आणि आक्रमक भूमिका घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. विशेषतः विनायकराव मासाळ यांना केंद्रस्थानी ठेवून पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती आखली जाणार असल्याचे संकेत यावेळी स्पष्टपणे दिसून आले.
राजकीय वर्तुळात या निवडीकडे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नव्या शक्तिकेंद्राची सुरुवात म्हणून पाहिले जात असून, जिल्हा परिषदेत आगामी काळात पक्षाची भूमिका अधिक प्रभावी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
