Sanvad News “महाराजांच्या सन्मानासाठी आटपाडीत उद्या दुग्धाभिषेक” सर्व शिवप्रेमींनी सकाळी १० वाजता नगरपंचायतीजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन!

“महाराजांच्या सन्मानासाठी आटपाडीत उद्या दुग्धाभिषेक” सर्व शिवप्रेमींनी सकाळी १० वाजता नगरपंचायतीजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन!

Admin

 “महाराजांच्या सन्मानासाठी आटपाडीत उद्या दुग्धाभिषेक”


किरीट सोमय्यांच्या वादग्रस्त कृतीविरोधात शिवप्रेमी आक्रमक; सर्व शिवप्रेमींनी  सकाळी १० वाजता नगरपंचायतीजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन

आटपाडी kd24newz :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ आटपाडी शहरात उद्या सकाळी भव्य दुग्धाभिषेक आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून घोषणा दिल्याच्या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या घटनेमुळे जनभावना दुखावल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटत आहे.

   या पार्श्वभूमीवर छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानाच्या रक्षणासाठी उद्या सकाळी ठीक १०.०० वाजता आटपाडी नगरपंचायतीसमोरील महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. या वेळी महाराजांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला जाणार आहे.

   याबाबत माहिती देताना शिवप्रेमी व मावळा समिती आटपाडी तालुका यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या पुतळ्याजवळ असंवेदनशील वर्तन करणे म्हणजे संपूर्ण शिवप्रेमी समाजाच्या भावना दुखावण्यासारखे आहे. महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही उद्या दुग्धाभिषेक करून निषेध नोंदवणार असून, हा लढा सन्मानाच्या रक्षणासाठी आहे,” असे त्यांनी सांगितले.

   या घटनेनंतर आटपाडी तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक, सांस्कृतिक व शिवप्रेमी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. उद्याच्या कार्यक्रमात महाराजांच्या सन्मानासाठी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

   दरम्यान, मावळा समिती आटपाडी तालुका व शिवप्रेमींच्या वतीने सर्व नागरिक, युवक, महिला भगिनी आणि इतिहासप्रेमींनी उद्या सकाळी १०.०० वाजता आटपाडी नगरपंचायतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आटपाडीतील वातावरण तापले असून, उद्याच्या दुग्धाभिषेक व निषेध कार्यक्रमाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

To Top