Sanvad News दिघंचीत महायुतीचा भव्य शक्तिप्रदर्शनाने प्रचार शुभारंभ ; राजेंद्र आण्णा देशमुखांचे स्फोटक भाषण, विरोधकांवर हल्ला बोल ’;आमदार सुहास बाबरांचे विजयाचे आवाहन,

दिघंचीत महायुतीचा भव्य शक्तिप्रदर्शनाने प्रचार शुभारंभ ; राजेंद्र आण्णा देशमुखांचे स्फोटक भाषण, विरोधकांवर हल्ला बोल ’;आमदार सुहास बाबरांचे विजयाचे आवाहन,

Admin

 दिघंचीत महायुतीचा भव्य शक्तिप्रदर्शनाने प्रचार शुभारंभ ; राजेंद्र आण्णा देशमुखांचे स्फोटक भाषण, विरोधकांवर हल्ला बोल ’;आमदार सुहास बाबरांचे विजयाचे आवाहन,


 महिला सहभाग ठरला चर्चेचा केंद्रबिंदू ; शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांसाठी पदयात्रा, सभा व पक्षप्रवेशातून वातावरण तापले




आटपाडी ; दिघंची (ता. आटपाडी) प्रतिनिधी :आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिघंची येथे शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ झाला. दिघंची जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मा. पृथ्वीराज भैय्या पाटील, विठ्ठलापूर पंचायत समिती गणाचे उमेदवार मा. दिलीप हेगडे तसेच दिघंची पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. कल्पना पुसावळे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेली पदयात्रा, त्यानंतरची भव्य सभा व शक्तिप्रदर्शनाने संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण तापले.

या प्रचार सभेत विद्यमान आमदार सुहासभैय्या बाबर यांनी थेट आव्हान देत महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. “दिघंची गट व पंचायत समिती गणाचा विकास हाच आमचा अजेंडा असून, पृथ्वीराज पाटील, दिलीप हेगडे व सौ. कल्पना पुसावळे यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहील,” असा विश्वास आमदार बाबर यांनी व्यक्त केला. त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण व शेतीपूरक सुविधा अधिक सक्षम करण्याचा निर्धार जाहीर केला.

सभेचे खरे आकर्षण ठरले ते माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचे आक्रमक आणि सडेतोड भाषण. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देत त्यांनी विरोधकांवर अक्षरशः हल्ला बोल केला. आपल्या स्पष्ट आणि परखड शब्दांत त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला आणि थेट मुद्द्यांवर प्रत्युत्तर देत उपस्थित मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

याच भाषणात राजेंद्र अण्णा देशमुख यांनी बापूसाहेब देशमुख व पडळकर बंधूंवरही जोरदार टीकास्त्र सोडले. “जनतेला फसवणाऱ्या राजकारणाला आता थारा राहिलेला नाही. विकासाची दिशा दाखवणारे आणि लोकांशी प्रामाणिक राहणारे नेतृत्वच जनता निवडणार आहे,” असा ठाम इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या स्फोटक भाषणामुळे सभास्थळी प्रचंड जल्लोष झाला आणि समर्थकांमध्ये उत्साह संचारला.

या कार्यक्रमास माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, आमदार सुहास भैय्या बाबर, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. तानाजीराव पाटील (अध्यक्ष), भारत तात्या पाटील, अनिलशेठ पाटील, बाळासाहेब होनराव, मुन्नाभाई तांबोळी, प्रणव गुरव, भैया मोरे, सभापती संतोष पुजारी, सरपंच अमोल मोरे, डॉ. उन्मेश देशमुख यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सचिन मोरे व दत्तात्रय वाघमारे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत महायुतीला पाठिंबा दिला. या पक्षप्रवेशामुळे महायुतीची ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून आले.

प्रचार पदयात्रा व सभेत युवक, शेतकरी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. विशेषतः महिला भगिनींच्या मोठ्या उपस्थितीमुळे प्रचार शुभारंभ हा ‘महिला शक्ती’च्या जोरदार प्रदर्शनात परिवर्तित झाला.

एकूणच अलोट गर्दी, आक्रमक भाषणे, विरोधकांवर थेट हल्लाबोल आणि विकासाचा ठोस अजेंडा यामुळे दिघंचीतील ही प्रचार सभा महायुतीच्या आत्मविश्वासाचे व निवडणुकीतील निर्णायक लढतीचे स्पष्ट संकेत देणारी ठरली.

To Top