Sanvad News जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक २०२६ : ९ फेब्रुवारीला मतमोजणी, प्रशासन सज्ज ! ४ गट व ८ गणांचा निकाल एका दिवसात; कडेकोट बंदोबस्तात ११ फेऱ्यांत मतमोजणी!

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक २०२६ : ९ फेब्रुवारीला मतमोजणी, प्रशासन सज्ज ! ४ गट व ८ गणांचा निकाल एका दिवसात; कडेकोट बंदोबस्तात ११ फेऱ्यांत मतमोजणी!

Admin

 जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक २०२६ : ९ फेब्रुवारीला मतमोजणी, प्रशासन सज्ज!

४ गट व ८ गणांचा निकाल एका दिवसात; कडेकोट बंदोबस्तात ११ फेऱ्यांत मतमोजणी!

आटपाडी kd24newz ; जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत आटपाडी तालुक्यातील एकूण ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गणांसाठी शनिवार दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली.

मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, या निवडणुकीची मतमोजणी सोमवार दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता आटपाडी तहसील कार्यालयात होणार आहे.

मतमोजणीसाठी एकूण १९ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी १ टेबलवर टपाली मतमोजणी तर उर्वरित १८ टेबल्सवर EVM मशीनवरील मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणी प्रतिनिधींना आवश्यक ओळखपत्रांचे वितरण तहसील कार्यालय, आटपाडी येथे करण्यात येणार आहे.

मतमोजणीची प्रक्रिया फेरी निहाय पार पडणार असून, संबंधित मतदान केंद्रांची माहिती तहसील कार्यालयाच्या बाहेरील फलकावर दर्शविण्यात आली आहे. सुरुवातीला खरसुंडी, करगणी, दिघंची व निंबवडे या जिल्हा परिषद गटांच्या क्रमाने मतमोजणी होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया एकूण ११ फेऱ्यांत, गटनिहाय व गणनिहाय पूर्ण केली जाणार आहे.

या महत्त्वाच्या कामकाजासाठी सुमारे १२२ अधिकारी व कर्मचारी यांना दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने मतमोजणी ठिकाणी १ पोलीस उपअधीक्षक, १० पोलीस अधिकारी, १०० पोलीस अंमलदार व होमगार्ड असा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे.

उमेदवारांना मतमोजणी कक्षात बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार कक्ष तयार करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल फोन आत नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. गटनिहाय मतमोजणी होत असल्याने, एकावेळी फक्त एका गटातील उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनाच मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.

नागरिकांना मतमोजणीची माहिती वेळोवेळी मिळावी यासाठी तहसील कार्यालयाबाहेर ध्वनी प्रक्षेपक प्रणाली उभारण्यात येणार आहे. सर्व संबंधित गट व गणांच्या फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाणार असून, संपूर्ण मतमोजणी पूर्ण होताच विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते तत्काळ प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.

ही संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया मा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. समाधान शेंडगे व मा. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शीतल बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

To Top