Sanvad News द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नांवर आमदार सुहास अनिलभाऊ बाबर यांची विधानसभेत आक्रमक भूमिका

द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नांवर आमदार सुहास अनिलभाऊ बाबर यांची विधानसभेत आक्रमक भूमिका

Admin

 द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नांवर आमदार सुहास अनिलभाऊ बाबर यांची विधानसभेत आक्रमक भूमिका

आटपाडी kd24newz ; राज्य विधानसभेच्या अधिवेशनात आमदार सुहास अनिलभाऊ बाबर यांनी लक्षवेधीद्वारे आपल्या मतदारसंघासह संपूर्ण सांगली जिल्हातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. सध्या आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला असून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) बंदरावर सांगली जिल्ह्यातील ७०० पेक्षा अधिक द्राक्ष कंटेनर अडकून पडले आहेत. दरवर्षी सांगली जिल्ह्यातून साधारणतः दीड हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात होते आणि या माध्यमातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होते. मात्र युद्ध किती काळ चालेल याबाबत अनिश्चितता असल्याने निर्यात ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना विशेष अनुदान जाहीर करावे व कर्जमाफी द्यावी, अशी ठाम मागणी आमदार सुहास बाबर यांनी सभागृहात केली.

यंदा अतिवृष्टीमुळे आधीच द्राक्ष उत्पादनात मोठी घट झाली असून ५० टक्क्यांहून अधिक बागा फेल गेल्या आहेत. एका एकर द्राक्षबागेसाठी सुमारे चार ते पाच लाख रुपये खर्च येतो. अशा परिस्थितीत उत्पादन घट, निर्यात अडथळे आणि वाढता खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, असे आमदार सुहास बाबर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याची मुख्य ओळख ही सर्वाधिक द्राक्ष निर्यात करणारा जिल्हा अशी आहे, असे त्यांनी नमूद केले.

मतदारसंघातील काही लहान गावांचे नगरपंचायतीत रूपांतर झाले असून त्या भागातील शेतकऱ्यांनाही रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून द्राक्ष लागवड व संबंधित पायाभूत सुविधा विकासासाठी विशेष योजना सुरू करावी, अशी मागणीही आमदार सुहास बाबर यांनी केली. 

तसेच खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे द्राक्ष संशोधन केंद्र उभारण्यात यावे, यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे आमदार सुहास बाबर यांनी सभागृहात जाहीर केले आणि शासनाने त्यासाठी तातडीने निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली. द्राक्ष उत्पादक शेतकरी हा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेणे अत्यावश्यक असल्याचे आमदार सुहास बाबर यांनी अधिवेशनात ठामपणे मांडले.

To Top