मेहनती युवा शेतकऱ्याच्या ढब्बू मिरची पिकावर तणनाशकाचा घाला!
दिघंचीत अज्ञात व्यक्तीचा संतापजनक प्रकार; एक एकर पिकाचे नुकसान, सुमारे १० लाखांचा फटका; आटपाडी पोलिसांत तक्रार
आटपाडी kd24newzs; दिघंची : शेतीत नव्या प्रयोगांची कास धरून कष्टाने उभे केलेल्या युवा शेतकऱ्याच्या पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशकाची फवारणी केल्याचा संतापजनक प्रकार दिघंची येथील पुजारवाडी हद्दीत घडला. युवा शेतकरी सचिन मेनकुदळे यांनी सुमारे दोन एकर क्षेत्रावर यंदा प्रथमच ढब्बू मिरचीचे पीक घेतले होते. पीक बहरात आले असून अवघ्या दोन-तीन दिवसांत तोडा सुरू होणार असतानाच सुमारे एक एकर क्षेत्रातील पिकावर तणनाशकाचा मारा करण्यात आल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा मेनकुदळे यांनी केला आहे.
मेनकुदळे यांनी मोठ्या मेहनतीने आणि आर्थिक गुंतवणुकीतून ढब्बू मिरचीचे पीक उभे केले होते. पीक चांगले बहरल्याने उत्पन्नाची अपेक्षा वाढली होती. मात्र, रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेतात तणनाशक फवारल्याचा आरोप असून, सकाळी शेतात गेल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. तणनाशकामुळे मिरचीची झाडे मोठ्या प्रमाणात खराब झाल्याचे दिसून आले.
शेतीकडे युवा पिढीने वळावे, यासाठी शासनासह विविध स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत. पारंपरिक पिकांबरोबरच नवीन पिकांचे प्रयोग करून युवा शेतकरी शेतीला आधुनिक दिशा देत आहेत. अशा परिस्थितीत सचिन मेनकुदळे यांच्यासारख्या युवा शेतकऱ्याने घेतलेल्या नव्या प्रयोगाला अशा प्रकारे धक्का बसणे ही चिंतेची बाब मानली जात आहे.
शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणाशी, वाढत्या उत्पादन खर्चाशी, रोगराईशी आणि बाजारभावाच्या अनिश्चिततेशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत माणसानेच माणसाच्या कष्टावर घाला घालणे अधिक वेदनादायी असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. कोणाशी वैयक्तिक वाद अथवा मतभेद असतील, तर त्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत; मात्र उभ्या पिकाचा नाश करून राग काढणे म्हणजे शेतकऱ्याच्या महिनोन्महिन्यांच्या मेहनतीची राख करणे होय.
या घटनेमुळे दिघंची परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, “शेतकऱ्याच्या उभ्या पिकावर तणनाशक मारणे कितपत योग्य?” असा सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः युवा पिढी शेतीकडे वळत असताना अशा घटना घडल्यास त्याचा शेती व्यवसायाबाबत विपरीत संदेश जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी सचिन मेनकुदळे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पिकाचे नुकसान करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून या प्रकारामागील व्यक्तीचा शोध घ्यावा आणि शेतकऱ्याच्या कष्टाने उभ्या केलेल्या पिकाची नासधूस करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून होत आहे.
“शेतकरी निसर्गाशी लढतोय, बाजारभावाशी झुंजतोय; आता त्याला माणसांशीही लढण्याची वेळ येऊ नये!”

