Sanvad News रेवणसिद्ध घाटातील भीषण एसटी अपघात - मृतांच्या वारसांना १० लाखांची मदत, जखमींचा सर्व खर्च शासन करणार

रेवणसिद्ध घाटातील भीषण एसटी अपघात - मृतांच्या वारसांना १० लाखांची मदत, जखमींचा सर्व खर्च शासन करणार

Admin

रेवणसिद्ध घाटातील भीषण एसटी अपघात - मृतांच्या वारसांना १० लाखांची मदत, जखमींचा सर्व खर्च शासन करणार ; आमदार सुहास बाबर 

आमदार सुहास बाबर यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी रात्रीपासून सातत्याने चर्चा

आटपाडी kd24news ; विटा: खानापूर तालुक्यातील रेवणसिद्ध (रेणावी) घाटात दोन एसटी बसच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या वारसांना परिवहन विभागाकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च शासन आणि एसटी महामंडळ करणार आहे.

खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी या अपघाताची माहिती मिळताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी काल रात्रीपासून सातत्याने संपर्क साधून पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर परिवहन विभागाने ही मदत जाहीर केली असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली.

गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास रेवणसिद्ध घाटात हा भीषण अपघात घडला. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ३८ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नंदा हरिदास त्रंबके (वय ६०, रा. खानापूर) आणि धोंडीराम लक्ष्मण पाटील (वय ७८, रा. बांबवडे, जि. सातारा) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये १९ महिला आणि सहा शाळकरी विद्यार्थिनींचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास बाबर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधला. पोलिस, प्रशासन आणि बचाव पथकाने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात जाऊन जखमींना उपचार मिळावेत यासाठी आमदार बाबर यांची धावपळ सुरू होती.

या अपघातातील सात गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सांगली, कराड आणि कोल्हापूर येथे हलवण्यात आले असून, १५ जणांवर विटा येथे उपचार सुरू आहेत. त्यापैकी नऊ जण अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहेत.


To Top