Sanvad News रात्री कुलपे लावण्याच्या प्रकाराने आटपाडीत गोंधळ; सकाळपर्यंत गाळ्यांवर नावांची चर्चा!

रात्री कुलपे लावण्याच्या प्रकाराने आटपाडीत गोंधळ; सकाळपर्यंत गाळ्यांवर नावांची चर्चा!

Admin

 रात्री कुलपे लावण्याच्या प्रकाराने आटपाडीत गोंधळ; सकाळपर्यंत गाळ्यांवर नावांची चर्चा!

आटपाडी kd24news : आटपाडीतील गाळे पुनर्वसनाचा वाद तहसीलदारांच्या दालनात पोहोचल्यानंतरही गुरुवारी रात्री या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाल्याचे चित्र दिसून आले. रात्री सुमारे आठच्या दरम्यान काही व्यक्तींनी तयार झालेल्या गाळ्यांना कुलपे लावल्याने गाळेधारकांमध्ये एकच खळबळ उडाली.

     त्यानंतर इतर खोकेधारकांनीही आपापल्या खोक्यांना कुलपे लावण्यास सुरुवात केल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली आणि काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना गर्दी हटवावी लागल्याची माहिती आहे.

     विशेष म्हणजे, तहसीलदारांनी शासकीय नियमांनुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिल्यानंतरही रात्रीच्या वेळी गाळ्यांवर कुलपे लावण्याची घाई का झाली? कुलपे लावण्याचा अधिकार नेमका कोणाला? आणि प्रशासनाचा अंतिम निर्णय होण्यापूर्वीच गाळ्यांवर ताबा निश्चित करण्याची लगबग का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

     दरम्यान, रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास खोकेधारकांची बैठक झाल्याची आणि त्यामध्ये गाळ्यांचे वाटप करण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली आहे. सकाळी पाहणी केली असता अनेक गाळ्यांवर शॉर्टकटमध्ये व्यक्तींची नावे टाकण्यात आल्याचे दिसून आल्याची माहिती आहे. काही गाळ्यांना कुलपे लावण्यात आली असून काही खोकेधारक आतील बाजूने गाळ्यांचे इंटेरिअरचे काम करीत असल्याचेही निदर्शनास आल्याचे सांगितले जात आहे.

      एकीकडे महसूल प्रशासनाकडून अधिकृत परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, तर दुसरीकडे गाळ्यांवर नावे, कुलपे आणि अंतर्गत कामे सुरू असल्याचे चित्र दिसत असल्याने ‘प्रशासनाच्या निर्णयापूर्वीच गाळ्यांवर हक्क निश्चित करण्याची घाई कोणाच्या जोरावर?’ हा सवाल उपस्थित होत आहे.

      या संपूर्ण प्रकाराकडे तहसीलदार प्रशासनाचे लक्ष आहे का? प्रशासनाने अधिकृत परवानगी दिलेली नसताना गाळ्यांवर नावे लिहिणे, कुलपे लावणे अथवा अंतर्गत कामे करणे याबाबत नेमकी कोणती कारवाई होणार? याकडे आता संपूर्ण आटपाडीकरांचे लक्ष लागले आहे.

To Top