अतिक्रमण काढून टाका म्हणायचे, मग गाळ्यांसाठी एवढा आग्रह कशासाठी ?
एकीकडे अतिक्रमण हटावासाठी जिल्हाधिकारी-तहसीलदारांकडे धाव; दुसरीकडे फळांच्या गाळ्यांचे जल्लोषात उद्घाटन आणि ४३ गाळ्यांचा मुद्दा ऐरणीवर — आटपाडीत सत्ताधारी गटाच्या भूमिकेवरून नागरिकांत चर्चा
आटपाडी kd24news: आटपाडी शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ‘अतिक्रमण नको आणि काढा म्हणायचे आणि दुसरीकडे तयार झालेल्या गाळ्यांसाठी आग्रह धरायचा, हा नेमका प्रकार काय?’ असा थेट सवाल आता नागरिकांतून उपस्थित होत आहे. शहरातील अतिक्रमणे हटवावीत, यासाठी सर्वपक्षीय पातळीवर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू असतानाच, मागील एक-दोन महिन्यांपूर्वी पुनर्वसनाच्या नावाने तयार करण्यात आलेल्या फळांच्या दुकानांच्या गाळ्यांचे मोठ्या जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनावेळी सत्ताधारी गटातील पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने आता या संपूर्ण प्रकरणावरून आटपाडी तालुक्यात चर्चा रंगली आहे.
आटपाडी शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न काही नवीन नाही. शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमणे झाल्याचा मुद्दा उपस्थित करत ती हटविण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. शहरातील अतिक्रमणे हटवावीत, यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील नगरसेवकांनीही अतिक्रमण हटविण्याची मागणी करत प्रशासनाकडे पत्रव्यवहार केल्याची भूमिका पुढे आली आहे.
मात्र, दुसरीकडे याच आटपाडीमध्ये पुनर्वसनाच्या नावाने दुकानदारांसाठी एकूण ४३ गाळे निर्माण करण्यात आले आहेत. या गाळ्यांच्या प्रक्रियेत सत्ताधारी गटाचा सहभाग असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या चर्चेला अधिक धार मिळण्याचे कारण म्हणजे मागील एक-दोन महिन्यांपूर्वी झालेला फळांच्या गाळ्यांचा उद्घाटन सोहळा.
फळांची दुकाने सुरू करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या गाळ्यांचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात करण्यात आले. हलगीचा निनाद, आतषबाजी आणि मोठी गर्दी, अशा वातावरणात उद्घाटनाचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला आटपाडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी तसेच भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे या उद्घाटनाचा राजकीय संदर्भही आता चर्चेत आला आहे.
याच पार्श्वभूमीवर नागरिकांचा सवाल अधिक तीव्र झाला आहे—जर अतिक्रमण काढायचेच असेल, तर या गाळ्यांच्या निर्मितीला आणि उद्घाटनाला एवढे महत्त्व का दिले गेले ?
विशेष म्हणजे, अतिक्रमण हटविण्यासाठी सत्ताधारी गटाकडून प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला गेला आहे.
शहरातील अतिक्रमण तलावाच्या परिसरापासून पुढे जिथे-जिथे आहे, ते सर्व हटविण्याची मागणी वरिष्ठ प्रशासनाकडे केली जात असल्याचे सांगितले जाते. अन्य गटाकडूनही अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. मग सर्वच पक्ष अतिक्रमणाच्या विरोधात असतील, तर तयार झालेल्या गाळ्यांच्या बाबतीत एवढा रस का? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
याच मुद्द्याला आणखी एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. परवा गदिमा स्मारकासमोरील पार्किंग जागेच्या प्रश्नावरून शिवसेना गट आणि सत्ताधारी भाजप गटामध्ये जोरदार राडा झाला. खोकी-गाळे, अतिक्रमण आणि जागेच्या वापराचा प्रश्न यावरून राजकीय संघर्ष उफाळून आला. त्यानंतर तयार करण्यात आलेल्या खोकी-गाळ्यांना कुळपे लावण्याचा प्रकार सुरू झाल्याने वातावरण आणखी तापले.
कुळपे लावण्यास सुरुवात होताच खोकीधारकांची धावपळ सुरू झाली. परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि गर्दी हटविण्यात आली. त्यामुळे गाळे, खोकी, पुनर्वसन आणि अतिक्रमणाचा प्रश्न आता केवळ प्रशासकीय न राहता थेट राजकीय संघर्षाचा विषय बनल्याचे चित्र आहे.
या संपूर्ण घटनाक्रमामुळे आटपाडीकरांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
एकीकडे ‘अतिक्रमण हटवा’ म्हणून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांकडे धाव घ्यायची; नवीन गाळे वाटप रात्रीत होते.आणि दुसरीकडे फळांच्या गाळ्यांचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करायचे.
एकीकडे शहरातील अतिक्रमण काढण्याची मागणी करायची; दुसरीकडे ४३ गाळ्यांच्या निर्मितीचा मुद्दा चर्चेत यायचा.
जर हे गाळे नियमबद्ध असतील, तर त्याची अधिकृत प्रक्रिया जनतेसमोर का स्पष्ट केली जात नाही? आणि जर अतिक्रमणाच्या कक्षेत येत नसतील, तर त्याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका का मांडू नये?
यामुळे आता नागरिकांतून एकच चर्चा रंगली आहे,सत्ताधारी गटाची अतिक्रमणाबाबत नेमकी भूमिका काय? अतिक्रमण खरंच नको आहे, की केवळ राजकीय सोयीनुसार काही अतिक्रमणे चालणार आणि काहींवर कारवाई होणार?
दरम्यान, प्रशासनाने अतिक्रमण हटावाबाबत घेतलेली भूमिका, गाळ्यांची निर्मिती व पुनर्वसनाची प्रक्रिया, ४३ गाळ्यांचा संबंधित जागेचा कायदेशीर दर्जा याबाबत स्पष्टता करणे आता गरजेचे बनले आहे.
अतिक्रमण हटावाची कारवाई झालीच पाहिजे; मात्र ती कारवाई कोणताही पक्ष, गट किंवा व्यक्ती न पाहता समान निकषाने झाली पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. अन्यथा एकीकडे अतिक्रमण हटावाची मागणी आणि दुसरीकडे निवडक गाळ्यांचे समर्थन अशी दुहेरी भूमिका असल्याची चर्चा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
आटपाडीतील हा संपूर्ण गाळे-अतिक्रमण वाद आता नेमका कोणत्या वळणावर जाणार, प्रशासन कोणती भूमिका घेणार आणि ‘अतिक्रमण हटविण्याच्या मागणी’सोबत ‘नवीन ४३ गाळ्यां’चा नेमका संबंध काय, याकडे आटपाडीकरांचे लक्ष लागले आहे.

