विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व स्व. शोभाकाकी अनिलभाऊ बाबर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विटा शहरात घरगुती गौरी-गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन
आटपाडी kd24news : विटा शहरातील गणेशोत्सवाची परंपरा अधिक समृद्ध करण्याबरोबरच घराघरातील कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व स्व. शोभाकाकी अनिलभाऊ बाबर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घरगुती गौरी-गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत विटा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष व उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर यांनी केले.
अमोलदादा बाबर म्हणाले, गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या पारंपरिक कला, संस्कृती आणि घरगुती सजावटीच्या कल्पकतेला प्रोत्साहन मिळावे, तसेच महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या हेतूने ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. पारंपरिक आरास, आकर्षक सजावट, पर्यावरणपूरक संकल्पना तसेच समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या विषयांना यंदाच्या स्पर्धेत विशेष महत्त्व दिले जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी 16 सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेचे पारितोषिक प्रथम क्रमांक रु २५ हजार, द्वितीय क्रमांक रु २० हजार, तृतीय क्रमांक रु १५ हजार,चतुर्थ क्रमांक रु ११ हजार, पाचवा क्रमांक रु ५ हजार, उत्तेजनार्थ बक्षीस प्रत्येकी रु २ हजार प्रत्येक विजेत्याला तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
17 सप्टेंबर रोजी तज्ज्ञ परीक्षक सहभागी स्पर्धकांच्या घरी जाऊन गौरी व गणपती आरास सजावटीचे परीक्षण करतील. सजावट करताना सामाजिक संदेश, पर्यावरणपूरक व पारंपारिक थीम यांना प्राधान्य दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी भारत पवार (9860252659), सारंग म्हेत्रे (8087704270) यांच्याशी संपर्क साधावा.
