Sanvad News जिंदाबाद !, जिंदाबाद !!, शिल्पकार प्रभाकरकाका भंडारे जिंदाबाद !!!

जिंदाबाद !, जिंदाबाद !!, शिल्पकार प्रभाकरकाका भंडारे जिंदाबाद !!!

Admin

जिंदाबाद !, जिंदाबाद !!, शिल्पकार प्रभाकरकाका भंडारे जिंदाबाद !!!


(लेखक) सादिक पापामियाँ खाटीक ज्येष्ट पत्रकार आटपाडी जि .सांगली . 

  आटपाडी kd24news; श्री . प्रभाकर नागेश भंडारे काका* या १३ अक्षरी नावाने सहा दशकांहूनचा अधिक काळ आटपाडी, खानापूर तालुका आणि सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्याच्या वृत्तपत्र विश्वावर गारुड घातले आहे . नव्वदीत वावरणाऱ्या काका आणि त्यांच्या दिवंगत पत्नी स्मिताकाकुंनी देशाला अभिमान वाटेल असे रत्न दिले . त्यांच्या आणखी दोन अपत्यांनी आपल्या विश्वात उंच भरारी घेतली आहे . अभिमान, गौरव वाटावा अशा शिल्पांना घडविणाऱ्या या काकांना त्यांच्या दि . २२ सप्टेंबर च्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा द्यायच्या आणि दिवंगत माऊली काकींच्या पवित्र आत्म्यास अभिवादन करायचे . त्यांचे स्मरण करायचे म्हणून हा लेखन प्रपंप .

          १९७३ - ७४ सालात माझ्या वडिलांना पिठाची गिरणी घालायची होती . त्यावेळी दिवंगत नारायणराव

आण्णा देशपांडे आणि श्री . प्रभाकरकाका भंडारे यांनी मदतीचा हात देत माझ्या वडिलांची पिठाची गिरणी सुरू करण्यात मोठी मोलाची भूमिका बजावली . अर्थात त्यावेळी बँक ऑफ इंडिया शाखा आटपाडीचे शाखाधिकारी राहिलेले पुण्याचे वसंतराव धुमाळ साहेब यांचेही सहकार्य मोलाचे ठरले होते .

          मुळचे खानापूर तालुक्यांतील विट्याचे रहिवाशी असणाऱ्या प्रभाकरकाका भंडारे यांनी, १९७० - ७१ च्या दरम्यान व्यवसायाच्या निमित्ताने आटपाडीत पाय ठेवले . प्रभाकरकाका भंडारे यांचे दोन्ही ज्येष्ट बंधू, विटा बँकेचे माजी चेअरमन कै . भाऊसाहेबकाका भंडारे आणि विटा बँकेचे माजी संचालक कै.चंद्रकांतदादा भंडारे हे विट्यातील मातब्बर प्रस्थ, समाजकारणी, राजकारणी म्हणून प्रसिद्ध होतेच शिवाय त्यांच्याकडे खानापूर - आटपाडी संपूर्ण तालुक्यांची आणि खटाव तालुक्यातल्या विट्यालगतच्या काही गावांची, वृत्तपत्रांची मोठी एजन्सी होती . याशिवाय विटा बँकेवर असलेला नैतिक अधिकाराचा दबदबा, किर्लोस्कर कंपनीचे पाणी खेचणारे इंजिन, मोटारी, नांगर वगैरे शेती उपयोगी विविध औजारांची एजन्सी विट्यातील भंडारे परिवाराकडे होती. आपसुकच प्रभाकरकाका भंडारे यांनी या व्यवसायाच्या आधारे हळु हळु आटपाडीच्या मातीत पाऊले घट्ट रोवण्यास सुरुवात केली .

          पहिली पासून ११ वी पर्यत माझा वर्गमित्र राहिलेल्या आणि एयर व्हाईस मार्शल पदावरून सेवानिवृत्त झालेल्या सुहास प्रभाकर भंडारे मुळे, भंडारे काकांच्या परिवारात माझा लहानपणा पासूनच वावर होता . माझे वडिल पापामियाँ आब्बास खाटीक हे नेहमी प्रभाकरकाका भंडारे यांच्या संपर्कात राहणारे . सणासुदीला किंवा विशेष प्रसंगी काका आमचे खास अतिथी असायचे . माझ्या मैत्रीमुळे सुहास आणि लहानगा प्रशांत अनेक वेळा माझ्या घरी ईदचे मेहमान व्हायचे . तीर्थस्वरूप काकु, सौ . मंजु , या मात्र क्वचितच माझ्या घरी आल्या असाव्यात . इतक्या घट्ट मैत्रीने आणि माझ्या वडिलांना विविध वृत्तपत्रे वाचायचा छंद असल्याने, मी ही त्या काळच्या पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ, तरुणभारत आणि केसरी या दैनिक वाचनाच्या प्रेमात पडलो . या अवांतर वाचनाने मलाही वृत्तपत्र विश्वाचे बारकावे समजले . नंतरच्या काळात मी पत्रकार म्हणून उदयास आलो . माझ्या आधी आटपाडीच्या वृत्तपत्र विश्वात प्रभाकरकाका भंडारे हे नाव भारदस्त म्हणून सर्वज्ञात होते . एखाद्या दुसऱ्या दैनिकाचा अपवाद वगळता, बातमीदार नसतानाही कोणत्याही दैनिकात बातमी छापून आणण्यात प्रभाकरकाका भंडारे माहिर होते .आटपाडी तालुक्यात विकासाच्या ज्या महत्वपूर्ण घडामोडी घडल्या त्यामध्ये काकांचाही मोलाचा वाटा होता . अनेक आमदार, नामदार, वृत्तपत्रांचे मालक संपादक, वरिष्ठ प्रतिनिधी, उच्च अधिकारी महोदयांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध होते . दैनिक आटपाडी दर्शन, हे खानापूर - आटपाडी मतदारसंघ दणाणून सोडणारे दैनिक अनेक वर्षे संपादक म्हणून चालविणारे काका पहिले आटपाडीकर संपादक होते . कोणत्याही राजकीय नेत्यांवर उघडपणे टीका - टिपन्नी करण्यात अथवा एखाद्या पक्षाचे, नेत्याचे राजकारणात उघडपणे समर्थन करण्यात काका कधी मागे राहिले नाहीत . १९७८ च्या विधानसभेच्या जीवघेण्या चुरशीच्या निवडणुकीत माजी आमदार आण्णासाहेब लेंगरे यांना आपल्या जीप मधून जीवाची पर्वा न करता स्वतः चालक बनत विट्यातील नेत्यांकडे घेऊन जाणारे काका कधी कोणाला घाबरले नाहीत . अथवा ते मागेही हटले नाहीत . त्याचा त्यांना काही अंशी त्रासही सोसावा लागला . प्रत्येक बिकट प्रसंगी काकांची सिंहीण अर्थात तिर्थस्वरूप काकी आलेल्या संकटांला सामोरे जाण्यात काकांच्या बरोबरीने अग्रभागी राहिल्याचे मी अनेकवेळा पाहिले आहे .

          जन्माने ब्राम्हण असणाऱ्या विटा आणि आटपाडीतल्या भंडारे काकांच्या परिवाराने कोणापुढे झुकण्याचे, घाबरण्याचे काम केले नाही . धाडसी, जिगरबाज आणि ध्येयवेड्या स्वभावाच्या भंडारे परिवारातल्या सर्वांमध्ये आटपाडीचे प्रभाकरकाका भंडारे सर्व बाजुंनी अवलिया होते . *पाणी रे, पाणी !, तेरा रंग कैसा, जिसमे मिलाए, लगे उस जैसा !* अशाच प्रकारे बिनधास्त, बेधडक, बेफाम आणि बेपर्वा वागणाऱ्या प्रभाकरकाका भंडारे यांनी, समस्त ब्रम्हवृंद ज्या मर्यादेत रहात . त्या सर्व मर्यादा कधीच ओलांडल्या होत्या . माता भगिनींच्या बाबतीत उच्च कोटीचे चारीत्र्यसंपन्न, सत्शील असणाऱ्या काकांनी, सर्व क्षेत्रांचा, खेळांचा इतर अवांतर अनेक बाबींचा मनमुराद आनंद घेतला . स्वतः वयाच्या चाळीशी पासून डायबेटीस पेशंट असणाऱ्या प्रभाकरकाका भंडारेंनी मांसाहार करणाऱ्या पट्टीच्या अनेक खवैय्यांना सदा सर्वकाळ लोळवले . यातल्या काही प्रसंगाचा मी साक्षीदार आहे . पिणाऱ्या भल्या भल्यांना गार करणाऱ्या काकांनी कधीही स्वतःचा संयम ढळू दिला नाही, गोडधोड खाण्यातही त्यांनी कधी कसर ठेवली नाही . इतका बिनधास्त माणूस मला आजअखेर अन्यत्र पहायला मिळाला नाही .

          आटपाडीच्या पत्रकारितेचा, वृत्तपत्र व्यवसायाचा ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी प्रभाकरकाका भंडारे हे नाव सुवर्ण अक्षरांनी अधोरेखीत केल्याशिवाय हा इतिहास पुरा होणार नाही . वृत्तपत्र व्यवसायात येणाऱ्या नवनव्या पत्रकारांना प्रभाकारकाका भंडारेनी केलेले मार्गदर्शन, प्रसंगी काढलेले चिमटे, त्यांच्या चुकांवर केलेल्या कोट्या, नर्मविनोद, प्रसंगी वडिलकीचा धाक, प्रेरक - मार्गदर्शक - उदबोधक ठरले . अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्यकारणीवर सांगली जिल्ह्यातून जाणारे प्रभाकरकाका भंडारे पहिले आटपाडीकर पत्रकार ठरले होते .

          सदैव हसरा चेहरा, नर्म विनोदी स्वभाव, चुकांच्या वर्मावर बोट ठेवण्याची वृत्ती, प्रत्येक ठिकाणी दिसणारा करारीपणा, वेगळे काहीतरी करण्यासाठी असलेली सातत्याची धडपड, ही काकांच्या स्वभाव धर्माची वैशिष्टये असली तरी अनेक चांगल्या व्यक्ती, चांगल्या गोष्टी, प्रसंगात, हळवे होणारे प्रभाकरकाका भंडारे सर्वांना भावत . *एक अकेला थक जाएगा, मिलकर बोज उठाना.* या गीतातील शब्दांच्या आशयाप्रमाणेच काकांनी सदैव सर्वांना मदतीचा हात दिला . धनदांडग्या, रानदांडग्या, जातदांडग्या, व्यक्तींकडुन कोणा - गरीब, उपेक्षित, वंचित, मागासाला त्रास झाल्यास प्रभाकरकाका भंडारे त्या अन्यायग्रस्ताच्या पाठीशी उभे रहातच, प्रसंगी पोलीस स्टेशन अन्य कार्यालयाच्या वरिष्टांपर्यंत आपल्यातला पत्रकार, नेता, नेक माणूस उभा करीत . त्यामुळे अनेक अन्याय कर्त्यांना चाप बसल्याचे अनेकवेळा मी अनुभवले आहे . मोजक्या आणि ठेवणीतल्या शब्दांनी काकांनी लिहिलेल्या, प्रसिद्ध केलेल्या बातम्या अनेकांच्यावर नेमका वर्मी घाव घालत .

          सहा दशकांच्या आटपाडीतल्या वास्तव्यात प्रभाकरकाका भंडारे यांनी केलेले एक नेक काम, मला आयुष्यभर भावले . अनेक वेळा आर्थिक विवंचना येवूनही, प्रसंगी अनेक संकटे , समस्या प्रश्न, निर्माण होऊनही काका - काकी या दांम्पत्याने जगाच्या बाजारात टणाटण उडणारी अमुल्य शिल्पे निर्माण करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही . खाणे पिणे, कपडालत्ता, अभ्यास आणि प्रशालेत आवश्यक असणारे साहित्य, इत्यादी शैक्षणिक साहित्य अथवा लागणारा प्रचंड पैसा ओतताना या दांम्पत्याने कधी माघार घेतली नाही . खतःच्या गरजांना चिमटा देत दिवसरात्र या शिल्पांवर आयुष्य वेचल्याचे सार्थक या दांम्पत्याच्या तिन्हीही लेकरांनी सिद्ध करून दाखविले .

          एयर व्हाईस मार्शल पदावरून सेवानिवृत्त होऊन पुण्यात स्थिरावलेले सुहास प्रभाकर भंडारे, पत्रकारीतेची पदवी संपादन करून नावारूपास आलेले, दैनिक पुढारी सारख्या मातब्बर वृत्तपत्राचे दोन दशकाचे पत्रकार प्रशांत उर्फ आण्णा भंडारे त्यांच्या विचारांचा वारसा जोपासत आहेत आणि उच्च शिक्षण घेऊन आपल्या संसारात रमलेल्या मंजुश्री भंडारे या त्रिकुटाने स्वतःलाच धन्य केले नाही तर आपल्या माता - पित्यासह संपूर्ण परिवारालच धन्य केले .

          कॅरम, कबड्डी, खोखो, क्रिकेट, बुद्धिबळ व्हॉलीबॉल, पोहणे अशा अनेक खेळ प्रकारात नेहमी उत्साहाने सामील होणाऱ्या प्रभाकरकाका भंडारे यांनी, आटपाडी शहरातल्या अनेक उपक्रमात, सण, वार, उत्सवात नेहमी हिरीरीने भाग घेतला . भिन्न धर्मीयात, विविध समाजात धार्मिक सौहार्द, आपसी प्रेम, सद्भावना सदिच्छा, वाढीस लागावी म्हणून प्रभाकरकाका भंडारे *इन्सानियतवाले सच्चे आटपाडीकर* म्हणून नेहमी सिद्ध होत . औंधाच्या राजांनी पेरलेल्या सदगुणांचे बीज सर्वत्र अवतरल्याचे प्रभाकरकाका भंडारे यांच्या जीवनाकडे पाहता जाणवते . आज माझे वडिल पापामियाँ आब्बास खाटीक आणि आई रशिदाबी पापामियाँ खाटीक हे दोघेही हयात नाहीत . माझ्या आईच्या आणि काकुंच्या परलोकी जाण्यात फक्त एक दिवसाचे अंतर आहे . तीर्थस्वरूप प्रभाकरकाका भंडारे यांच्या रूपाने माझ्या मित्रांचे अर्थात माझेही वडिल, माझे मार्गदर्शक आज नव्वदी साजरी करताहेत. हे खरे आनंददायी आहे . काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मी माझ्या पिताश्रींनाच शुभेच्छा देतो . असा भास मला होतो आहे . खरोखरच वडिलांसमान असणाऱ्या काकांना परमेश्वराने उत्तम आरोग्य, शतकी पार आयुष्य आणि नातवंडे, परतवंडाचेही शिल्पकार होण्याचेही भाग्य द्यावे . *काकाही, सबके शिल्पकार है !* हेच पिढ्यान पिढ्या आधोरेखित व्हावे . *जिंदाबाद !, जिंदाबाद !!, ऐ मोहब्बत जिंदाबाद !!*, प्रेमाला जगविख्यात करणाऱ्या या गीतातील भावार्थाप्रमाणे अथवा परमपुज्य साने गुरुजींच्या, *खरा तो, एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे !,* याचाच प्रत्यय देण्याऱ्या *प्रभाकरकाका भंडारे यांना आटपाडीचे कर्मवीर, कर्मयोगी म्हणून भविष्यात ओळखले जावे .* एवढीच विधात्याकडे नम्र अपेक्षा .

To Top