भाजपकडे सत्ता मिळवण्यासाठी ईडी हेच एक शस्त्र;ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक
भाजपचे सत्ता मिळवण्यासाठी ईडी हेच एक शस्त्र वापरून पक्षातील आमदार खासदार मंत्री यांना येडीची भीती घालून पक्ष फोडा आणि राज्य करा. या फोडा आणि जोडा कुटनीतीचा वापर देवेंद्र फडणवीस करीत आहेत असे प्रतिपादन सांगली जिल्हा राष्ट्रवादी कार्याध्यक्ष ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केले. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वैभव दादा पाटील यांच्या प्रचारार्थ भांबर्डे, वासुंबे, देवनगर, सांगोले, जोंधळखिंडी, वाळूज,देवीखिंडी आणि माधळमुठी येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माननीय सदाशिव भाऊ पाटील होते. मुळीक पुढे म्हणाले की, भाजप पक्षात मूळ भाजप राहिली का? असा प्रश्न पडतो. सर्व पक्षातून ईडीच्या शस्त्राने आयात उमेदवार घेऊन सत्ता काबीज करण्याचे धोरण आहे. महाराष्ट्राचे सरकार कोणाकडे द्यायचे यासाठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाचे आहे.
महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्व लोकांनी जागरूकतेने काम करून आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे . महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वैभव दादा पाटील यांना ताकद द्यावी.
शेतकरी,कामगार, महिला यांना महाविकास आघाडीचे सरकारच न्याय देऊ शकते. आज महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आमच्या सरकारच्या काळात घरगुती गॅस साडेचारशे रुपयाला येत होता. महायुतीने महागाई वाढवून तो हजाराच्या घरात नेऊन ठेवला आहे. सामान्य नागरिकांनी जगायचे कसे? जीवनावश्यक वस्तू महागल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अध्यक्ष भाषणात माननीय सदाशिव भाऊ पाटील म्हणाले की, देशात विट्याची नगरपालिका स्वच्छतेत एक नंबरला आणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळवून विटा नगरपालिकेचे नाव देशात केले. त्यासाठी स्वतः कष्ट करावे, झिजावे लागते त्यातून कर्तुत्व निर्माण होते. वैभव दादांची उमेदवारी ही कर्तृत्वावर मिळालेली आहे ती वारसा हक्काने मिळालेली नाही.
जनतेसाठी वेळ,कष्ट करण्याची जिद्द आणि कर्तृत्व निर्माण करून नेतृत्व प्राप्त करण्याची लढाई आहे. सर्व जनतेने महाविकास आघाडीची विचारधारा कार्यपद्धती अनुसरून महाविकास आघाडीच्या 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्ह समोरील बटन दाबून मा. वैभव दादा पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आव्हान करतो. तुम्ही दिलेल्या मताशी प्रतारणा होणार नाही. त्या मताचा आदर करीत मतदारसंघाचा सर्वांनी विकास करण्यासाठी माननीय वैभव दादा पाटील बांधील असतील.
यावेळी शरद बसागरे, रामचंद्र देशमुख, दिलीप लोंढे,संभाजी निकम,सुशील केंगार, सुरेश सवणे,अजय चव्हाण,विजय मंडले, सचिन माळी, सतीश घाडगे, सिद्धेश्वर धावड, सुहास पवार, सुरज पवार,आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.