लाच घेताना जिल्हा कृषी विभागातील अधिकारी रंगेहात अटकेत
एसीबीची सांगलीत कारवाई, 30 हजारांची लाच स्वीकारताना सापळा यशस्वी
आटपाडी kd24newz :सांगली जिल्हा कृषी विभाग, सांगली येथे कार्यरत असलेल्या संतोष चौधर (सध्या रा. गणेश नमन अपार्टमेंट, विश्रामबाग, सांगली) या लोकसेवकास 30,000/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई 23 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली.
तक्रारदार (वय 31, व्यवसाय – कृषी औषध कंपनी) यांनी सांगितले की, त्यांनी तळेगाव एमआयडीसी येथे पॅरागॉन ॲग्री केअर नावाची कृषी औषध कंपनी स्थापन केली आहे. कंपनीच्या डीलर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (DRC) प्रक्रियेसाठी जिल्हा कृषी विभाग, सांगली यांच्याकडून इन्स्पेक्शन रिपोर्ट आवश्यक होता. याच कामासाठी आरोपी चौधर यांनी तक्रारदाराकडे 35,000/- रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने तात्काळ एसीबी सांगलीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर 24 एप्रिल 2025 रोजी अंमलबजावणी करताना एसीबीच्या पथकाने चौधर यांना त्यांच्या केबिनमध्ये 30,000/- रुपये स्वीकारताना रंगेहात अटक केली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पथकात पो.हवा. ऋषिकेश बडनीकर, पो.ना. प्रितम चौगुले, पो.शि. अजित पाटील यांचा समावेश होता. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली येथे गुन्हा नोंदवून सुरू आहे.
नागरिकांना आवाहन:
शासकीय कामासाठी कोणताही अधिकारी/कर्मचारी अगर खाजगी व्यक्ती फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली येथे संपर्क साधावा.
मो. 9552539789 / कार्यालयीन क्र. 0233-2373095 / टोल फ्री क्र. 1064
आपली ओळख गोपनीय ठेवली जाईल.
– उमेश दा. पाटील
पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली