Sanvad News मेंढपाळाचा मुलगा ते IPS अधिकारी : बिरदेव डोणे यांची प्रेरणादायी यशकथा

मेंढपाळाचा मुलगा ते IPS अधिकारी : बिरदेव डोणे यांची प्रेरणादायी यशकथा

Admin

 मेंढपाळाचा मुलगा ते IPS अधिकारी : बिरदेव डोणे यांची प्रेरणादायी यशकथा

 कोल्हापूरच्या माळरानावरून दिल्लीच्या लालबत्तीकडे वाटचाल करणाऱ्या बिरदेवची कहाणी जिद्दीची आणि धैर्याची 

आटपाडी :kd24newz:नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेच्या निकालात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील जळोची गावच्या बिरदेव डोणे याने 551 वा क्रमांक पटकावत भारतीय पोलीस सेवेत (IPS) आपले स्थान पक्के केले आहे. साधारण घरात जन्मलेला, मेंढपाळाचा मुलगा असलेला बिरदेव आज देशाच्या सर्वोच्च सेवेत निवडला गेलाय, ही गोष्ट गावकऱ्यांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

प्रारंभिक संघर्ष आणि पुण्यातील शिक्षण:

बिरदेव लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता, पण घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. त्याचे वडील मेंढपाळाचे काम करत असत. COEP मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात गेलेल्या बिरदेवची सुरुवात थोडी अवघड होती. बोलणं, वागणं आणि राहणीमानावरून काही मुलं त्याची चेष्टा करायची.

        तेव्हाच त्याची ओळख झाली प्रांजल चोपडे या सिनिअरशी — जळोचीच्याच डॉ. राजेंद्र चोपडे यांचा पुतण्या. “हा आपल्याच धनगर समाजातून असावा,” असं प्रांजलच्या मनात आलं आणि नाव विचारताच ते निश्चित झालं. त्यानंतर प्रांजलने बिरदेवला मानसिक आधार दिला. त्यांच्यात खरी मैत्री झाली आणि या मैत्रीचा आधार बिरदेवला पुढच्या प्रवासातही मिळत गेला.

स्पर्धा परीक्षा आणि जिद्दीची वाटचाल:

इंजिनिअरिंगनंतर प्रांजलने UPSC चा मार्ग निवडला. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत बिरदेवनेही सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. कोणतीही नोकरी न करता, घरच्या आर्थिक ओढाताणीच्या परिस्थितीतही त्याने अभ्यास सोडला नाही. या प्रवासात COEP मधील आणखी एक मित्र, अक्षय सोलनकर याची त्याला वेळोवेळी साथ मिळाली.

    प्रांजलने दोन वर्षांपूर्वी फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवड होऊनही बिरदेवचा संघर्ष सुरुच होता. पण जिद्द, चिकाटी आणि स्वप्नांवर विश्वास ठेवत त्याने अखेर यशाला गवसणी घातली.

निकालाचा दिवस आणि खऱ्या यथार्थाचे चित्र:

UPSC चा निकाल जाहीर झाला त्या दिवशी प्रांजलने यादी पाहताच 551 व्या क्रमांकावर बिरदेवचं नाव पाहिलं. तो लगेच फोन लावतो, पण बिरदेव माळावर मेंढरे चारत असतो. कारण, वडील आजारी — काही महिन्यांपूर्वी किडनीच्या ऑपरेशनसाठी पैसे उधार घ्यावे लागले. बिरदेवनेच मित्र आशिष पाटील (IAS) आणि प्रांजलकडे मदतीसाठी हात पसरला होता. आशिषच्या ओळखीतून कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात ऑपरेशनची व्यवस्था झाली. मात्र, ऑपरेशननंतर काही गुंतागुंत झाल्याने वडील अजूनही आजारी होते. त्यामुळे निकालाच्या दिवशीही बिरदेव मेंढरे चारत होता.

भविष्याचा IPS आणि भूतकाळातील एक किस्सा:

थोड्याच दिवसांपूर्वी पुण्यात बिरदेवचा मोबाईल हरवला होता. तो पोलीस स्टेशनला गेला, तक्रार घ्यायलाच अधिकारी तयार नव्हते. प्रशिक्षित IPS अधिकाऱ्यांच्या ओळखीनं तक्रार नोंदली गेली, पण अजून मोबाईल सापडलेला नाही. "तपास चालू आहे," हेच उत्तर त्याला वारंवार मिळत होतं. आज, तक्रार घ्यायला तयार नसलेल्या याच व्यवस्थेचा तो एक जबाबदार अधिकारी ठरणार आहे.

बिरदेव डोणे याचा प्रवास हा केवळ एक वैयक्तिक यश नसून, तो सामाजिक परिवर्तनाचा संदेश देतो. आपल्या हालअपेष्टा आणि अनुभवांमुळे तो एक संवेदनशील, सजग आणि लोकाभिमुख अधिकारी ठरेल याची खात्री वाटते. अशा या ध्येयवेड्या युवकाला त्याच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

विडिओ पहा:



To Top