अनिल सर्जेराव पाटील यांचा भाजपाला राजीनामा;भाजपाने गमावला एक अनमोल हिरा
आटपाडी kd24newz: जि. सांगली — गेल्या दहा वर्षांपासून भाजपात कार्यरत असलेले आणि युवामोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले अनिल सर्जेराव पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदांपासून आणि सदस्यत्वातून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने तालुक्यात खळबळ उडाली असून, भाजपाने एक निष्ठावंत, कर्मयोगी, आणि प्रभावी नेतृत्व गमावले असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
अनिल पाटील हे आपल्या धाडसी कार्यशैली, प्रामाणिक नेतृत्व, आणि सातत्याने घेतलेल्या उपक्रमांमुळे युवकांमध्ये विशेष लोकप्रिय होते. त्यांच्या " गोरगरीब वंचित यांच्या मदतीला धावणारे युवा नायक" या वाक्याने त्यांची ओळख निर्माण झाली होती. युवकांमध्ये त्यांचा प्रभाव इतका आहे की, अनेक नवतरुण त्यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय राजकारणात सहभागी झाले.
तालुक्याच्या विविध भागांमध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल संपूर्ण जिल्ह्यात घेतली गेली आहे. पक्षाच्या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, सामाजिक कार्यामधील सहभाग आणि लोकांशी असलेला थेट संपर्क यामुळे त्यांना सर्वत्र आदर मिळाला.
सध्या सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे लागून आहे की अनिल पाटील पुढे कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांचे समर्थक, तालुक्यावासीय आणि युवा वर्ग त्यांच्या पुढील निर्णयाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
राजकारणातील हा 'डॅशिंग' चेहरा पुढे कोणत्या दिशेने मार्गक्रमण करतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.