कृषी सहायक संघटनेचा एल्गार: पदोन्नती व अन्य मागण्यांसाठी आंदोलनाची हाक
ऐन खरिपाच्या पार्श्वभूमीवर आज पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरु
आटपाडी kd24newz| प्रतिनिधी आटपाडी तालुक्यातील कृषी सहायक संघटनेने राज्य संघटनेच्या आदेशानुसार पदोन्नती व इतर प्रलंबित मागण्यांसाठी ऐन खरिपाच्या तोंडावर आंदोलनाची हाक दिली आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री श्रीमंत बुधावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मेपासून विविध टप्प्यांत हे आंदोलन राबवण्यात येणार आहे.
सध्या राज्यभरात ११,५२७ कृषी सहायक कार्यरत असून केवळ ७०० कृषी पर्यवेक्षक पदे उपलब्ध आहेत. यामुळे अनेक सहायकांना २० ते २५ वर्षांची सेवा करूनही पदोन्नती मिळत नाही. सद्यस्थितीतील ६:१ या कृषी सहायक ते पर्यवेक्षक प्रमाणाला बदलून ४:१ करण्याची प्रमुख मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेच्या इतर मागण्यांमध्ये कृषी सहायकांना 'सहायक कृषी अधिकारी' हे पदनाम देणे, सेवाकालीन स्थैर्य देणे, लॅपटॉप व मदतनीस उपलब्ध करून देणे, तसेच 'पोकरा' योजनेसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये सक्षम सहभाग मिळवून देणे यांचा समावेश आहे.
९ एप्रिल २०२५ रोजी पुण्यात पार पडलेल्या कृषी विभागाच्या कार्यशाळेत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी सहायकांसाठी लॅपटॉप व पदनाम बदलाची घोषणा केली होती. मात्र त्या घोषणांना अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणी मिळालेली नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.
कृषी सहायकांवरील अन्यायाविरोधात शासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचे स्पष्ट करत संघटनेने तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
संघटने कडून होणाऱ्या आंदोलनाचे टप्पे :
५ मे: काळ्या फिती लावून कामकाज
६ मे: सर्व शासकीय व्हाट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडणे
७ मे: तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
८ मे: एक दिवसाची सामूहिक रजा
९ मे: सर्व ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार
१५ मे: सर्व योजनांचे कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे