पुणे येथे गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत; नवीन शैक्षणिक वर्षास उत्साहात सुरुवात!
आटपाडी kd24newz :पुणे : पुण्यनगरीतील पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर, मनपा शाळा क्रमांक 74 जी मराठी येथे 16 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या प्रारंभाला उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. या वेळी केंद्रीय सहकार व नागरी वाहतूक राज्यमंत्री व लोकप्रिय खासदार मा. श्री. मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन आणि खाऊ वाटप करून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. गणेश सोनुणे, तसेच एस.सी.ई.आर.टी. चे डॉ. अरुण सांगोलकर (विभाग प्रमुख, प्रसार माध्यम विभाग, इंग्रजी विभाग) आणि डॉ. संदीप मुळे (विभाग प्रमुख, माहिती तंत्रज्ञान विभाग, राज्य अकॅडमी ऑथॉरिटी) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना अभ्यासाचे महत्त्व पटवून देणारे मार्गदर्शन केले.
या प्रवेशोत्सव प्रसंगी माजी नगरसेविका माधुरीताई सहस्रबुद्धे, माजी नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, माजी नगरसेवक जयंत भावे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व पुस्तकवाटपात सहभाग नोंदवला.
शनी मारुती बालगणेश मंडळ व देशप्रेमी मित्र मंडळ (केदार बलकवडे) यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, उपशिक्षक, शिक्षकवृंद, सेवकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरले.