डॉ. शंकरराव खरात साहित्य संमेलन भव्य दिव्य स्वरूपात, सर्वांना सोबत घेऊन साजरे करू ; मा.आ.राजेंद्र आण्णा देशमुख यांचा निर्धार
आटपाडीमध्ये डॉ. शंकरराव खरात साहित्य संमेलन ११ जुलै रोजी;भव्य आयोजनाची जय्यत तयारी!
आटपाडी (प्रतिनिधी) – आटपाडी गावचे सुपुत्र, थोर साहित्यिक, कवी, लेखक, समाजसुधारक, आणि दलित साहित्याचे खंदे पुरस्कर्ते, साहित्यरत्न कुलगुरू डॉ. शंकरराव खरात यांच्या जन्मदिन वर्षानिमित्त त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची उजळणी करणारे भव्य दिव्य डॉ. शंकरराव खरात साहित्य संमेलन शुक्रवार, दिनांक ११ जुलै २०२५ रोजी आटपाडी (जि. सांगली) येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे आयोजन साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान, आटपाडी (जि. सांगली) तर्फे करण्यात येत आहे.
या संमेलनाच्या आयोजनासाठी प्रारंभिक तयारीचा आढावा घेण्यासाठी रविवार, दिनांक १५ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजता श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूतगिरणी, आटपाडी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे होते. बैठकीत संमेलनाचे स्वरूप, विविध उपक्रम, समित्यांची निर्मिती, निधी संकलन, साहित्यिक व मान्यवरांना निमंत्रण, ग्रंथप्रदर्शन, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आदी बाबत सविस्तर चर्चा होऊन रूपरेषा ठरविण्यात आली.
या बैठकीस साहित्यिक, साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शिवाजीराव पाटील (तात्या), आप्पासाहेब काळबाग, आयु. विलास खरात (सरचिटणीस), नंदकुमार खरात, आप्पा खरात, प्रा. डॉ. सयाजीराजे मोकाशी, व्ही. एन. देशमुख सर, श. भा. बलवंत, विठ्ठल गवळी, वसंत विभूते, नानेश डोंगरे, शिवाजी बंडगर, दीपक खरात, प्रा. डॉ. कृष्णा इंगवले, सौ. मंगल इंगवले, डॉ. उत्तम चंदनशिवे, यशवंत मोटे, डॉ. विजय मोटे, चंद्रवर्धन लोडगे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.
साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात साहित्य संमेलन २०२५ हे संमेलन फक्त एक साहित्य सोहळा न राहता, दलित साहित्य चळवळ, सामाजिक समता, व विवेकशील विचारांचा जागर करणारे प्रभावी व्यासपीठ ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या संमेलनात राज्यभरातील अनेक नामवंत साहित्यिक, विचारवंत, संशोधक व कवी सहभागी होणार आहेत.
सर्व आटपाडीकर, साहित्यप्रेमी व नागरिकांनी या ऐतिहासिक संमेलनात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयु. विलास खरात, सरचिटणीस, साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान, आटपाडी (जि. सांगली) यांनी केले आहे.