"डॉ. शंकरराव खरात"
आयु, विलास खरात, आटपाडी
सांगली जिल्यातील आटपाडी गावात डॉ. शंकरराव खरात यांचा जन्म ११ जुलै १९२१ रोजी झाला. त्यांचे बालपण अत्यंत खडतर परस्थितीत गेले. डॉ. शंकरराव खरात यांचे प्राथमिक शिक्षण हे औंध संस्थान कालीन आटपाडी या गांवात झाले. त्यांनी लोखंडी लामणदिव्यावर अभ्यास केला. त्यांना शिक्षणाचे महत्व समजले होते. त्यासाठी ते औंधला शिक्षणासाठी उंटाच्या मागे ६० मैल पायी चालत गेले. औंधच्या श्री यमाई हायस्कूल मध्ये अॅडमिशन घेवून बोर्डिंग मध्ये राहिले. औंधच्या शिक्षकांनी त्यांना अनेक प्रकारची मदत केली. त्यानंतर पुढे ते पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधून पदवीधर झाले. अत्यंत हलाखीच्या गरीब परिस्थितीशी झुंज देत त्यांनी आपले एल.एल.बी. चे शिक्षण ही त्यांनी मोठ्या धाडसाने व चिकाटीने पूर्ण केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पुणे येथे स्थापन केलेल्या "युनियन बोर्डिंगचा" त्यांना फार मोठा आधार मिळालेला होता.
आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग लोकांसाठी व्हावा या ध्येयापोटी त्यांनी आंबेडकरी चळवळीत उडी घेतली. महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार सामाजिक व राजकीय कार्यात अग्रेसर राहिले. "प्रबुद्ध भारत" चे संपादक म्हणून कामकाज पाहत होते. मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. अनेक शासकीय व निमशासकीय कमिट्यावर सन्मानाची पदे त्यांनी भूषविली आहेत.
डॉ. शंकरराव खरात हे मराठी लेखक, कादंबरीकार, कथा लेखक होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगांव येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. त्यांच्या कथा, कादंबऱ्यात समाज्यातील शेवटच्या घटकाचे दैन्य, दारिद्रय, वेदना, अहवेलना, पारदर्शकपणे त्यांनी मांडलेल्या आहेत. दलित व भटक्या जमातीच्या प्रश्नावर आवाज उठवून त्यांनी त्या साहित्यात अंकित केलेल्या आहेत. अस्पृश्य समूहातील शेवटच्या स्तरातील लोकांना स्वावलंबी, स्वतंत्र, जीवन जगण्याची संधी, अवसर मिळावा या बाबतचे महत्वपूर्ण विचार ते साहित्य लेखनातून व विचार मंचावर व्यक्त करीत असत. "तराळ अंतराळ" या आत्मचरित्रास देशाच्या राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांचा गौरव करणेत आलेला होता. "तराळ अंतराळ" हे आत्मचरित्र अनेक भाषेत काढणेत आलेले आहे. त्यांना देशातून व विदेशातून अनेक सन्मान जनक पुरस्कार मिळालेले आहेत.
अशा या थोर साहित्यीक डॉ. शंकरराव खरात यांच्या जन्मदिनी शुक्रवार दिनांक ११ जुलै २०२५ रोजी आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात स्मृती साहित्य संमेलन आयोजित केले आहे. तरी, सर्व साहित्यिकांनी, कवींनी, साहित्य प्रेमींनी व ग्रामस्थांनी साहित्य संमेलनास उपस्थित रहावे, ही नम्र विनंती. कळावे.
आपला नम्र
आयु. विलास खरात
सरचिटणीस,
साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जि. सांगली (महाराष्ट्र राज्य)
मो.नं.९२८४०७३२७७