Sanvad News दिघंचीत दिव्यांग निधी व ट्रॅक्टर खरेदीप्रकरणी धडक आंदोलन; चौकशीच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित

दिघंचीत दिव्यांग निधी व ट्रॅक्टर खरेदीप्रकरणी धडक आंदोलन; चौकशीच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित

Admin

 दिघंचीत दिव्यांग निधी व ट्रॅक्टर खरेदीप्रकरणी धडक आंदोलन; चौकशीच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित


आटपाडी kd24newz ;दिघंची (ता. आटपाडी) गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित दिव्यांग निधी वाटप तसेच ग्रामपंचायतीकडून नव्याने खरेदी करण्यात आलेल्या ट्रॅक्टरच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज दिघंचीमध्ये अॅड. विलास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग नागरिकांनी व ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन छेडले. बसस्थानक ते ग्रामपंचायत असा वाजतगाजत मोर्चा काढून ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्यात आले.

    या आंदोलनादरम्यान तालुका पंचायत अधिकारी शिपुरे आणि ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, नवाळे यांनी “मी फक्त सहा महिन्यांपूर्वी कार्यभार स्वीकारला आहे, मागील घडामोडींची माहिती नाही,” असे उत्तर दिले. यामुळे आंदोलकांमध्ये अधिक असंतोष व्यक्त झाला.

    आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांग निधीचे वितरण झाले असल्याचे कागदपत्र दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात कोणत्याही लाभार्थ्याच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. उलट काही प्रकरणांमध्ये निधीचा चेक सरपंचाच्या खात्यावर वर्ग केल्याचे आरोप त्यांनी केले. ट्रॅक्टर खरेदीबाबतही पारदर्शकतेचा अभाव असून, ट्रॅक्टर चुकीच्या कामासाठी वापरण्यातही  आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    पंधरा दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर, अॅड. विलास देशमुख यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा केली. “जर वेळेत कारवाई झाली नाही, तर पुढच्या टप्प्यात आमरण उपोषणाचा इशारा दिला जाईल,” असे ते यावेळी म्हणाले.

To Top