Sanvad News हिंदीच्या गाढ्या अभ्यासक डॉ. दुर्गा दीक्षित यांचे दुःखद निधन

हिंदीच्या गाढ्या अभ्यासक डॉ. दुर्गा दीक्षित यांचे दुःखद निधन

Admin

 हिंदीच्या गाढ्या अभ्यासक डॉ. दुर्गा दीक्षित यांचे दुःखद निधन



आषाढी एकादशीच्या शुभप्रभेचे काळोखात रूपांतर…




आटपाडी kd24newz,पुणे : महाराष्ट्रात हिंदीच्या प्रचार-प्रसाराला आयुष्य वाहून घेणाऱ्या जेष्ठ लेखिका, शिक्षिका आणि समाजसेविका डॉ. दुर्गा विश्वनाथ दीक्षित (वय ८६) यांचे ६ जुलै २०२५ रोजी पहाटे ४.३० वाजता दुःखद निधन झाले. त्या दीर्घ आजाराने ग्रस्त होत्या. आषाढी एकादशीच्या शुभप्रभेचे हे दुःखद क्षण त्यांच्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये आणि साहित्यवर्तुळात हळहळ निर्माण करणारे ठरले.

डॉ. दीक्षित यांनी केवळ किशोर वयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून शैक्षणिक वाटचाल सुरू करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख पदापर्यंत यशस्वी वाटचाल केली. १९६२ मध्ये त्या इंग्रजी आणि हिंदी विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. १९७० मध्ये त्यांनी हिंदी विषयात पीएचडी पूर्ण केली. त्या पुण्यात हिंदी व संस्कृत विषय शिकवणाऱ्या पहिल्या महिला शिक्षकांपैकी एक होत्या.

स्वेच्छानिवृत्तीनंतर डॉ. दीक्षित यांनी ऐक्यभारती रिसर्च इन्स्टिट्यूट आणि ऐक्यभारती प्रतिष्ठानची स्थापना केली. या संस्थांमार्फत त्यांनी संशोधन, प्रकाशन, परिषदांचे आयोजन, कौशल्यविकास शिबिरे व व्यावसायिक अभ्यासक्रम राबवले. विशेषतः महिलांसाठी त्यांनी विविध शिबिरे आयोजित करून त्यांना सक्षम बनविण्याचे कार्य हिरीरीने केले.

विद्यार्थ्यांच्या, लेखकांच्या आणि संशोधकांच्या लेखी डॉ. दीक्षित म्हणजे – जिवंत विद्यापीठ.....

त्यांनी महाराष्ट्र लोकसाहित्य परिषद, दलित नाट्य संमेलन, बहुभाषा युवा अभिव्यक्ती वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन व संयोजन केले. घोले रोडवरील महात्मा फुले संग्रहालयात त्यांनी विविध परदेशी भाषा शिकविणारे वर्ग चालवले.

त्यांचे साहित्य आणि योगदान – एका ग्रंथकोशासमान..

रससिद्धान्त का सामाजिक मूल्यांकन, नाटक और नाट्यशैलिया, महाराष्ट्र का लोकधर्मी नाट्य, हिंदी रंगमंच का अलक्षित संदर्भ असे त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. तसेच डायमंड महाराष्ट्र संस्कृती कोश आणि माझा भारत – आपला भारत हे ग्रंथ मराठी आणि हिंदीतून प्रकाशित असून अमेझॉनवर उपलब्ध आहेत.

डॉ. दीक्षित यांनी अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे भाषांतरही केले आहे. सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या मराठी ग्रंथाचा त्यांनी नि:शुल्क हिंदी अनुवाद केला. महात्मा फुले समग्र वाङ्मय ची दुर्मिळ १९६८ मधील आवृत्ती आणि अनेक मौल्यवान ग्रंथ त्यांनी रघुनाथ ढोक यांना भेट दिले. त्यांचे संत वाङ्मय की सामाजिक फलश्रुती हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

देशविदेशात मान्यता – समाजभान व भाषाभान जपणारी शिक्षिका..

भारत सरकारतर्फे त्यांची इटलीतील नेपल्समधील ओरिएंटल युनिव्हर्सिटीमध्ये हिंदी अध्यापनासाठी नेमणूक झाली होती. त्या महाराष्ट्र हिंदी परिषद या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा होत्या. तसेच भारत सरकारच्या राजभाषा समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशनल अॅण्ड सोशल फाउंडेशन व इतर संस्थांशी त्या मार्गदर्शिका म्हणून कार्यरत होत्या. बिहार राष्ट्रभाषा परिषदेतर्फे त्यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आले होते.

त्यांच्या पश्चात भाचे विक्रम आणि विवेक विजय दाते हे आहेत. त्यांनी डॉ. दीक्षित यांची मनोभावे दीर्घ काळ सेवा केली.

हिंदी, संस्कृत, मराठी आणि समाजकार्याच्या चतु:सैनिक मार्गाने अखंड प्रवास करणाऱ्या या थोर आत्म्यास kd24newz परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

To Top