आटपाडीच्या शेळ्या-मेंढ्या बाजारात बकऱ्याला विक्रमी ₹१.२० लाखांचा दर!
सभापती संतोष पुजारींच्या नेतृत्वात पारदर्शक व्यवहार, आकर्षक सुविधा व यशस्वी नियोजन
आटपाडी kd24newz (२८ जून) :आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवडी शेळीबकरी बाजारात शनिवारी झालेल्या व्यवहाराने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. खरसुंडी (ता. आटपाडी) येथील शेतकरी दादा अंकुश कटरे यांचा देखणा, वजनदार व चार दाती माडग्याळ जातीचा बकरा तब्बल ₹१,२०,०००/- या विक्रमी दराने विकला गेला.
हा बकरा श्री. शिवाजी मल्हारी काळे, रा. पाटकूळ (ता. मोहोळ) यांनी विकत घेतला. बाजारात या व्यवहाराने खळबळ माजवली असून बकरा खरेदीनंतर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात यशाचे स्वागत करण्यात आले.
बाजारात या वेळी सुमारे ३ ते ३.५ कोटी रुपयांची उलाढाल झाली. बाजारात आलेली आवक, व्यापाऱ्यांची गर्दी आणि शेतकऱ्यांना मिळणारे चांगले दर यामुळे आर्थिक गती अधिक गतिमान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बाजार समितीकडून RO पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था, CCTV यंत्रणा, स्वच्छ आणि सुरक्षित परिसर, तसेच खरेदी-विक्रीसाठी सक्षम नियोजन यामुळे शेतकरी व व्यापारी दोघांनाही समाधानकारक अनुभव मिळत आहे.
सभापती मा. संतोष (भाऊ) पुजारी यांनी बाजारात उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.त्यांनी बाजारातील व्यवहार, पारदर्शकता, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि सुविधा याबाबत स्वतः लक्ष घातले.
त्यांच्यासोबत केलेल्या चर्चांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करताना, "बाजार समितीचा विकास, पारदर्शक व्यवहार आणि सुविधा वाढवण्यासाठी संतोष पुजारींचे योगदान वाखाणण्याजोगे आहे,"से सांगितले.
संतोष पुजारी यांनी बाजारातील हालचालींचा आढावा घेत शेतकऱ्यांचे अभिप्राय व चौकशी करताना त्यांची जाणीवपूर्वक बांधिलकी प्रकर्षाने जाणवली.
संचालक सुबराव (नाना) पाटील हे देखील व्यवस्थापनात सक्रिय राहून नियोजन व अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार अधिक सुस्थितीत चालत आहे.
या ऐतिहासिक विक्रीवेळी बाजारात दीपक राजगे, गजानन कोळेकर,भीमा पुजारी, दादा कोळेकर व शेतकरी व व्यापारी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी बाजार समितीच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, "ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या या बाजाराने आमच्यासाठी नवी दिशा दिली आहे,"असे मत व्यक्त केले.
या बाजारपेठेची घडी बसवण्यात सर्व संचालक, सचिव व कर्मचारीवर्ग सातत्याने मेहनत घेत आहेत. त्यांच्या एकजुटीच्या प्रयत्नांमुळे शेतकरी-व्यापारी यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.
आटपाडी शेळी- मेंढ्या बाजाराने यंदा केवळ विक्रमी दरच गाठला नाही, तर पारदर्शकता, सुविधा, नियोजन आणि नेतृत्वाच्या जोरावर ग्रामीण अर्थकारणात नवसंजीवनी दिली आहे. ही घडामोड बाजार समितीच्या यशस्वी वाटचालीस दिशा दाखवणारी ठरते.