सांगली जिल्ह्यात कडक बंदोबस्त! 17 ते 31 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
आटपाडी, दि. 16 (kd24newz) सांगली, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा-जत्रा आणि विविध आंदोलने यांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश दि. 17 ऑक्टोबर 2025 रोजीच्या मध्यरात्री 00.01 वाजल्यापासून ते 31 ऑक्टोबर 2025 रोजीच्या रात्री 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहणार आहेत.
सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश लागू करण्यात आले असून, सांगली जिल्ह्याच्या संपूर्ण स्थलसीमा हद्दीत हे आदेश प्रभावी राहतील.
🚫 मनाई असलेली कृत्ये :
या आदेशानुसार खालील कृत्यांवर संपूर्ण मनाई करण्यात आली आहे......
शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा कोणतीही शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी वस्तू बाळगणे.
कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.
दगड, क्षेपणास्त्रे, फेकण्याची साधने, उपकरणे जमा करणे किंवा तयार करणे.
व्यक्तींच्या आकृत्या, प्रतिमा किंवा प्रेतांचे प्रदर्शन करणे.
घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे किंवा शांतता भंग करणारे हावभाव करणे.
फलक, चित्रे, चिन्हे तयार करणे किंवा प्रसारित करणे ज्यामुळे सार्वजनिक शांततेस धोका निर्माण होऊ शकतो.
परवानगीशिवाय पाच किंवा अधिक व्यक्तींची गर्दी करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी जमाव करणे.
अपवाद :
हा आदेश खालील परिस्थितींना लागू होणार नाही......
कायदेशीर कर्तव्य बजावणारे शासकीय कर्मचारी,
धार्मिक विधी, अंत्यविधी,
तसेच परीक्षा इत्यादी कामकाज.....
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.